वाचन हा व्यक्तिमत्त्व विकासाचा अविभाज्य भाग – प्रा. बी. सी. शिंगाडे - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2018

वाचन हा व्यक्तिमत्त्व विकासाचा अविभाज्य भाग – प्रा. बी. सी. शिंगाडे


प्रत्येक विद्यार्थ्याने अवांतर वाचन करून ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. मनोरंजन, माहिती, भाषाप्रभुत्व, कल्पकता यासाठी वाचन अत्यावश्यक आहे. वाचनाची व जीवनध्येयाची नेमकी दिशा ठरवून प्रयत्न केल्यास यशाला गवसणी घालता येते. वाचन हा व्यक्तिमत्व विकासाचा अविभाज्य भाग आहे असे प्रतिपादन प्रा. बी. सी. शिंगाडे यांनी केले. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील इंग्रजी, हिंदी व मराठी विभागाच्या वतीने आयोजित `वाचन प्रेरणा` दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते.


प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले,``विद्यार्थ्यांनी ग्रंथाशी जवळीक करून ज्ञान समृद्ध करावे. तर्कशुद्ध व मुद्देसूद लिहिण्याचा पाया वाचन हाच असून आजच्या युगात विद्यार्थ्यांनी बहुश्रुत होण्यासाठी ज्ञानग्रहणाची सर्व कवाडे उघडायला हवीत असे आवाहन केले.`` प्रास्ताविक प्रा. सरोजिनी दिवेकर यांनी केले. कु. ज्योती मटकर व सुखराणी पाटील यांनी अग्निपथ मधील उतारा वाचला. प्रा. एस. एन. पाटील यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला. अमोल गावडे यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. आर. एन. साळुंखे, प्रा. ए. डी. कांबळे, प्रा. डी. एम. मोरे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.