ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची ज्येष्ठ नागरिक संघटनेची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2018

ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची ज्येष्ठ नागरिक संघटनेची मागणी


महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नागरिक धोरण नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात जाहीर झाले. ज्येष्ठांच्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी या धोरणात विविध खात्यांमध्ये सूचना देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नागरिक धोरण प्रभावीपणे राबवा व तशा सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्याधिकारी अमन मित्तल यांनी सर्व खाते प्रमुखांना सूचना दिल्या. यापुढे प्रत्येक तालुक्यातील आरोग्य केंद्रात दर बुधवारी ज्येष्ठांसाठी मोफत औषधोउपचार केले जाणार आहेत. रक्त गट तपासणी मोफत केली जाणार आहे. महिन्यातील एक दिवस ज्येष्ठ नागरिकांसाठी तालुका पातळीवर आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. समाज कल्याण खात्यामार्फत विरंगुळा केंद्र आणि शासनाच्या योजनांबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. दि. १५ डिसेंबर पर्यंत सर्व संबंधीत खात्यांनी ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीचा आराखडा सादर करावयाचा आहे अशा सूचना दिल्या. यावेळी जि. प. चे विविध खात्यांचे पदाधिकारी, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष पी. के. माने, सचिव अजुंमन खान, सहसचिव सोमनाथ गवस, मानसिंगराव जगताप, विजय चव्हाण, कुलकर्णी आदी उपस्थित होते.