महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे विद्युत अपघातामध्ये होणारे बळी रोखण्याची आमदार कुपेकर यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2018

महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे विद्युत अपघातामध्ये होणारे बळी रोखण्याची आमदार कुपेकर यांची मागणी


महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे विद्युत अपघातामध्ये बळी जात आहेत. उर्जा विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन कामामध्ये सुधारणा करण्याच्या सक्त सूचना द्याव्यात. देखभाल व दुरुस्तीचे काम वेळेवर चांगल्या पद्धतीने व्हावे. अन्यथा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितावर निश्चित करण्यासाठी सरकारी पातळीवर निर्णय व्हावा व कारवाई करावी अशी मागणी राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केली आहे.
गेल्या सहा महिन्यामध्ये कोल्हापूर विभागामध्ये महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे जवळ-जवळ 60 जणांचे बळी गेले. यामध्ये तुटलेल्या तारेच्या स्पर्श झाल्यामुळे 25 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच 17 जनावरे विज अपघाताची बळी ठरली. यामध्ये 14 शेतकऱ्यांचा मृत्यू तर तुटलेल्या तारेच्या स्पर्शामुळेच झाला. यामध्ये चंदगड मतदार संघातील 2 जणांचा समावेश असून त्यामध्ये तुडये (चंदगड) येथील अनिल पाटील यांचे गायींसह 50 हजाराने नुकसान झाले. हाजगोळी (चंदगड) येथील विठ्ठल देवळी व कागणी येथील परशराम बाचुळकर यांचा मृत्यू झाला. या दुर्घटना महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच झालेल्या आहेत. अशा घटना या सातत्याने घडत असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या सुरु असलेल्या कामामध्ये वापरत असलेल्या साहित्याबद्द्ल व कामाबद्दल शंका निर्माण होत आहे. याबाबत ग्रामीण भागामध्ये तीव्र नाराजी आहे. महावितरणकडून देखभाल दुरुस्तीचे काम वेळेवर व चांगल्या प्रकारे होत नसल्यामुळे अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे उर्जा विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन कामामध्ये सुधारणा करण्याच्या सक्त सूचना द्याव्यात. तसेच देखभाल, दुरुस्तीचे काम वेळेवर चांगल्या पद्धतीने व्हावे अन्यथा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितावर निश्चित करण्यासाठी सरकारी पातळीवर निर्णय व्हावा अशी मागणी आमदार कुपेकर यांनी केली आहे.