शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी दौलतच्या जमीनीपैकी काही जमीन विक्री करण्याचा आदेश - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2018

शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी दौलतच्या जमीनीपैकी काही जमीन विक्री करण्याचा आदेश


हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम थकीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस बिले देण्यासाठी दौलतच्या एकूण जमिनीपैकी काही जमीन विक्री केली जाणार आहे. जमीन विक्री संदर्भातील नोटीस नुकतीच तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी जारी केली असून याबाबत 29 नोव्हेंबरला हा लिलाव होणार आहे.
तालुक्याची अस्मिता असलेला दौलत साखर कारखाना तालुक्याच्या विकासातील भागीदार होता. मात्र गेल्या दहा वर्षापासून कारखाना अनेक कारणांनी अडचणीत आल्याने पर्यायाने यावर अवलंबून असलेले घटक व ऊस उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडला आहे. जवळपास सात ते आठ वर्षापूर्वी कारखाना खासगी कंपनी तासगावकर शुगर्सला चालवायला दिला. मात्र त्यांना अपयश आले. त्यामुळे या हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या काही शेतकऱ्यांना अंतिम टप्यात बिले मिळाली नाहीत. त्यानंतर काही वर्षे कारखाना चालवायला देण्यासाठी हालचाली झाल्या. मात्र त्यांना यश मिळाले नाही. दौलतला जिल्हा बँकेने कर्ज दिले होते. त्याची देणी थकल्यानंतर बँकेने कर्जापोटी जिल्हा मध्यवर्ती बँकेने कारखान्याचा ताबा घेतला. त्यानंतरही अनेक टेंडर निघाली मात्र कारखाना चालवायला घेण्यासाठी कोणीही तयार नव्हते. शेवटी 2016-17 च्या हंगामात बँकेने हा कारखाना गोकाक (कर्नाटक) येथील न्युट्रीयंट्स ॲग्रो फ्रुट्स कंपनीला चालवायला दिला. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने दौलत वाचविण्यासाठी ऊस पाठवला. मात्र पहिल्याच वर्षी शेतकऱ्यांची बिले थकली. त्यामुळे पुन्हा उत्पादक शेतकरी, कामगार, तोडणी व ओढणी वाहतुकदार अडचणीत आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे थकीत देणी देण्यासाठी साखर आयुक्तांनी कारखान्याच्या जमिनीपैकी काही जमीन विक्री करुन शेतकऱ्याचीं देणी द्यावीत. असा आदेश साखर आयुक्तांनी बजावला आहे. त्यानुसार तहसिलदारांनी जमिन लिलावाची नोटीस जारी केली आहे.