‘दौलत’ ची साखर विकून शेतकर्‍यांची बिले द्या, जमिनीच्या लिलावाला विरोध - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2018

‘दौलत’ ची साखर विकून शेतकर्‍यांची बिले द्या, जमिनीच्या लिलावाला विरोध


हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याची जमीन विक्री करुन शेतकऱ्यांच्या बिलाचे पैसे देण्याचा आदेश साखर आयुक्तांनी दिला आहे. याबाबत दौलत वाचविण्यासाठी दौलतच्या गोदामातील शिल्लक असलेली साखर विकून, तासगांवकर शुगर्स व न्युट्रीयन्स कंपनीची मालमत्ता विकून शेतकर्‍यांची थकीत ऊस बिले द्या. दौलतच्या एक इंच जमिनीचाही लिलाव होऊ देणार नाही. असा पवित्रा आज पाटणेफाटा (ता. चंदगड) येथे झालेल्या सर्व पक्षीय जन आंदोलन कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
आमदार हसन मुश्रीफ यांना फक्त बँकेची काळजी वाटत आहे. पण शेतकरी व कामगारांचे काय? असा सवाल ॲड. संतोष मळवीकर यांनी उपस्थित केला. दौलत कारखाना बंद पडल्याचा फायदा खासगी कारखाने घेत आहे. हेमरस (ओलम शुगर्स) कारखान्याचे आज अखेर ३३० रुपये प्रतिटन येणे आहेत. तर नलवडे कारखान्याकडून प्रतिटन ७४० रुपये येणे बाकी आहे. बेळगांव येथील हुबळी कारखान्याचेही येणे बाकी आहे. थकीत बिले दिल्याशिवाय ऊस न देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी सरपंच विष्णु गावडे, विलास पाटील, पांडूरंग बेनके,  दत्तू बेळगांवकर, वसंत निट्टूरकर, एन. जी. गावडे, रॉबर्ट फर्नांडीस, ज्ञानेश्‍वर पाटील, रविंद्र पाटील यांच्यासह शेतकरी व कामगार उपस्थित होते.

चौकट – तहसिलमध्ये सोमवारी बैठकीचे आयोजन
दौलतबाबत सोमवार ५ नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात तहसीलदार शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत न्युट्रीयट्न्स, हेमरस, नलवडे या कारखान्यांच्या प्रशासनाबरोबर जिल्हा बँकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.