ढोलगरवाडी, करेकुंडी ते होसुर रस्त्याला सर्पमित्र टक्केकर यांचे नाव देण्याचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

29 November 2018

ढोलगरवाडी, करेकुंडी ते होसुर रस्त्याला सर्पमित्र टक्केकर यांचे नाव देण्याचा निर्णय

ढोलगरवाडी-करेकुंडी-होसुर रस्त्याला सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांचे नामकरण करताना नागरीक.

कालकुंद्री / प्रतिनिधी
ढोलगरवाडी ते करेकुंडी, बुक्किहाल, कौलगे, होसुर या सुमारे आठ किलोमीटर रस्त्याचे "सर्पमित्र कै बाबुराव टक्केकर मार्ग "असे नामकरण करण्याचा कार्यक्रम नुकताच ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे पार पडला. अध्यक्षस्थानी के. वाय. पाटील होते. स्वागत तानाजी वाघमारे यांनी केले.
प्रास्ताविक झिम्माना पाटील गुरुजी यांनी केले. सर्पमित्र म्हणून जागतिक दर्जाचे योगदान देणारे कै बाबुराव टक्केकर हे सत्यशोधक समाजाचे पाईक होते. ते काहीकाळ शिवसेना तालुकाप्रमुख होते. सन १९६०-७० च्या दशकात ढोलगरवाडीला जोडणारे सुंडी, महिपाळगड, मांडेदुर्ग, करेकुंडी ते बुक्किहाळ, कौलगे, होसुर, कडलगे बुद्रुक हे रस्ते म्हणजे केवळ पायवाटा होत्या. त्या काळात रस्ते रुंदीकरणासाठी भागातील रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचे कै. टक्केकर यांनी प्रबोधन केले. प्रसंगी तीव्र विरोध व मारहानही सहन केली. तरीही व्रत सोडले नाही. मामासाहेब लाड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अनेक वेळा श्रम शिबिरे आयोजित करून ढोलगरवाडीला जोडणाऱ्या या रस्त्यांना मूर्त रूप दिले. त्याकाळी त्यांना विरोध करणाऱ्या लोकांना आज रस्त्यांच्या बारमाही जाळ्याचे महत्त्व उमजले आहे. याचे संपूर्ण श्रेय कै. टक्केकर यांना जाते. हे ओळखून ढोलगरवाडी पंचक्रोशीतील सर्व गावच्या ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे वरील रस्त्याला त्यांचे नाव दिले. यावेळी टी. एस. सुतार, आर. व्ही. पाटील, एस. आर. पाटील, अशोक राजस, विठोबा ओळकर, प्रताप पाटील, शंकर गिरी, एम. एम. कुट्रे, शिवाजी चौगुले, संजय वणारी उद्योजक बेळगाव, संभाजी ओऊळकर, सर्पमित्र प्रशांत पाटील, प्रकाश सुभेदार, आनंद सावंत, व्ही. जे. पाटील यांच्यासह आजी, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते, मामासाहेब लाड विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

No comments:

Post a Comment