![]() |
आदित्य रेडेकर |
चंदगड / प्रतिनिधी : रमेशराव रेडेकर फाऊंडेशन च्या वतीने गडहिंग्लज येथील वि. दि. शिंदे हायस्कूल शेजारील मैदानावर २१ ते २४ डिसेंबर २०१८ हे चार दिवस पहिल्या भूमिनंदन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष आदित्य रेडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले शेतीमालाला योग्य भाव देणारी बाजारपेठ आणि शेतकऱ्यासाठी श्रम कमी होऊन अधिक उत्पादन घेण्यासाठी लागणारे आधुनिक तंत्रज्ञान. कौशल्य असणाऱ्या हाताला काम आणि साधन असणाऱ्या उद्योगांना कच्चा माल आणि मनुष्यबळ. नव्या संकल्पना आणि क्षमतांना आर्थिक पाठबळ अशा एकाच व्यासपीठावर एकमेकांशी नव्याने संवाद प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अल्प भूधारकांपासून.. जमिनदारांपर्यंत.... बचत गटापासून मोठ्या उद्योजकांपर्यंत....शालेय विध्यार्थ्यापासून.. उच्च शिक्षित बेरोजगारापर्यंत...शेतकरी,कष् टकरी,कामगार,महिला,जेष्ठ नागरिक,युवक,युवती,लहान मुले,समाजातील सर्व स्तरातील सर्व घटकांचा विचार करून एकात्मिक मांडणी केलेले लोकल ते ग्लोबल संवाद स्थापित करणारे या विभागातील हे पहिलेच भव्य प्रदर्शन असल्याचे ते म्हणाले.
या महोत्सवात कृषी, कृषी तंत्रज्ञान, सिंचन, पशुपालन, डेअरी तंत्रज्ञान, कृषी पूरक उद्योग, खाद्य प्रक्रिया उद्योग, पर्यटन विषयक संधी, उपलब्ध असणाऱ्या विविध रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी आणि त्यासाठी पाठबळ देणाऱ्या शासनाच्या विविध योजना, वित्तीय संस्था, सहकारी संस्था, बचत गट, गृहोपयोगी वस्तू आणि निवासी आणि व्यापारी वास्तू, वाहन उद्योग, असे सर्वसमावेशक बहुराष्ट्रीय कंपन्यांपासून स्थानिक उद्योजकांचे स्टॉल असणार आहेत. यानिमित्ताने विभागातील खास पदार्थांसह विविध प्रांतांची खाद्य संस्कृती, यासोबत छोट्यांसाठी मनोरंजन पार्क हे खास आकर्षण ठरणार आहे. गडहिंग्लज आणि सीमा भागातील पहिलेच भव्य प्रदर्शन आहे शिवाय महोत्सवाचे ठिकाण सर्वांच्या सोयीचे आहे. त्याची मांडणी देखील आकर्षक आणि सुटसुटीत पद्धतीने करण्यात येणार आहे. दक्षिणेच्या विभागाचे प्रतिनिधित्व करत असल्याने चंदगड – आजरा- गडहिंग्लज आणि सीमा भागातील प्रत्येक भूमिपुत्राचा सहभाग महत्वाचा आहे. या महोत्सवातील ५० टक्के स्टॉल स्थानिक उद्योजक, सहकारी संस्था, बचत गट यांच्यासाठी राखीव आहेत.