चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील रस्त्याकडेला असणाऱ्या झाडांना आग लावणे, जाहिरातीसाठी खिळे ठोखणे यासारख्या प्रकारामुळे भल्या मोठ्या झाडाच्या जिवावर संक्रांत येत आहे. संबंधित विभागाने अशा लोकांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.
चंदगड तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याकडेला भलीमोठी झाडे आहेत. प्रामुख्याने बेळगाव--वेंगुर्ला मार्गावरील चंदगड तालुक्यातील हद्दीत रस्त्याच्या दुतर्फा आंबा, फणस, सिसम, वड आदी जातींची झाडे आहेत. स्वातंत्र्यपुर्व काळात ब्रिटिश सरकारने लावलेल्या या झाडांमुळे चंदगड तालुक्याला एक वेगळेपण प्राप्त झाले आहे. चंदगडच्या निसर्गात भर पडली आहे. या मार्गावरुन जा-ये करणाऱ्यांचे जणु ही झाडे स्वागत करतात असे भासते. रस्त्याच्या कडेला अनेक प्रकारच्या या झाडांवरील पक्षी, प्राण्यांना आता राहणे कठीण झाले आहे. कारण झाडांच्या बुद्यांला आग लावण्यांच्या प्रकारात दिवसें-दिवस वाढ होत आहे. त्यामुळे या झाडांचे जीवन धोक्यात आले आहे. तालुक्यात दर वर्षी सुमारे आठ-दहा झाडे या प्रकारे नष्ठ होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र गांभीर्याने पाहत नाही तर पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आशा कामी कोणी पुढे येत नाहीत. झाडांची होत असलेल्या हानीमुळे या रस्त्याचे महत्वही कमी होत आहे. एकेकाळी या रस्त्याने जाताना दुतर्फा असणाऱ्या गर्द झाडांच्या सावलीमुळे उन्हातही प्रवास सुखाचा व्हायचा. मात्र दिवसेंदिवस झाडे आग लावण्याच्या प्रकारामुळे रस्त्याला भकासपण येवु लागला आहे. तर जुनाट वाढलेली झाडे वाळत चाललेली आहेत. ती वेळीच तोडली पाहिजे. याचेही गांभीर्य बांधकाम विभागाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून हे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment