माडवळे, तडशिनहाळ, कुद्रेमानी परिसरात जखमी बिबट्याचा वावर, माडवळेत कुत्रे फस्त - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2018

माडवळे, तडशिनहाळ, कुद्रेमानी परिसरात जखमी बिबट्याचा वावर, माडवळेत कुत्रे फस्त

माडवळे-तडशिनहाळ (ता. चंदगड) येथील परिसरात वावरत हाच तो जखमी असलेला बिबट्या.


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील माडवळे व तहशिनहाळ परिरासरात बिबट्याचा वावर असल्यामुळे नागरीकांच्यामध्ये घबराटीचे वातावरण आहे. काल माडवळे येथे बिबट्याने कुत्रे फस्त केले. सद्या बिबट्याचा वावर तडशिनहाळ व कुंद्रेमानी परिसरात आहे. चंदगड व बेळगाव वनविभागाच्या वतीने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने अनेक नागरीकांनी त्याचे चित्रण मोबाईलवर केले आहे.
माडवळे येथे काल (शुक्रवारी) बिबट्याने कुत्रे खावून फक्त केले. हि बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे बिबट्या पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. बिबट्याच्या पायाला जखमी झाल्याने तो लंगडत पळत होता. त्यामुळे त्याचे दर्शन लोकांना झाले. बिबट्या आल्याची माहीती मिळाल्यानंतर पाटणे वनविभागाच्या वतीने याची खात्री करण्यासाठी पथकाने घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी त्यांना तेथे बिबट्याच्या पायांचे ठसे मिळून आले. त्याचबरोबर आज सकाळी वनविभागाच्या काही कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष बिबट्या दिसल्याने बिबट्या या परिसरात असल्याच्या वृत्ताला दुरोजा मिळाला. आज शनिवारी सकाळी तडशिनहाळ येथील एका कुत्र्याला बिबट्याने पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांनी आरडाओरडा करुन कुत्र्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवून घेतले. त्यामुळे बिबट्या पुढे कर्नाटकातील कुद्रेमानी हद्दीत पसार झाला. चंदगड तालुक्यातील पाटणे वनविभागाच्या वतीने बिबट्याला पकडण्यासाठी व्युव्हरचना तयार केली आहे. वनविभागाच्या वतीने माडवळे परिसरात पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याठी नियोजन केले आहे. वनविभागाचे पथक बिबट्याच्या मागावर आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक-बेळगाव वनविभागाच्या पथकानेही आज कुद्रेमानी येथे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. चंदगड व बेळगाव वनविभागाच्या वतीने बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कुद्रेमानी हे गाव कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे बिबट्या कधी कर्नाटकात तर कधी महाराष्ट्रात फिरत आहे. त्यामुळे दोन्ही वनविभागाच्या दृष्टीने बिबट्या डोकेदुखी ठरला आहे. बिबट्याला पाहण्यासाठी लोक गर्दी करत असल्यामुळे एखादी दुर्घटना घडू नये. यासाठी नागरीकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने केले आहे.

ढेकोळीत कुत्रे फस्त
चार दिवसापूर्वी ढेकोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील म्हातारु कणगुटकर यांचे कुत्रे बिबट्याने फस्त केले. 20 नोव्हेंबर 2018 ला रात्री हि घटना घडली होती. तेव्हापासून बिबट्या कधी कर्नाटकात तर कधी महाराष्ट्रात आपले दर्शन देत असल्यामुळे वनविभागाची झोप उडाली आहे.