संघटनाच शिक्षकांचा आधार - जेष्ठनेते बी. डी. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

09 December 2018

संघटनाच शिक्षकांचा आधार - जेष्ठनेते बी. डी. पाटील

चंदगड तालूका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या मेळाव्यात प्राचार्य ए .एस . पाटील यांच्या जादूचे चौकोन या पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर

तेऊरवाडी / प्रतिनिधी
संघटना ही अत्यंत महत्त्वाची आहे. शासन नवनवे दररोज अन्यायकारी आदेश आणि परिपत्रके काढत आहे. स्वयं अर्थसहाय्य शाळांना मान्यता देऊन अनुदानीत शाळा बंद करून शिक्षणाचेच खाजगीकरण करण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी माध्यमिक शिक्षकांनी आपल्या न्याय हक्क आणि कर्तव्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे. संघटनेच्या माध्यमातून आज पर्यंत अनेकांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. ज्या शिक्षकांच्यावर अन्याय झाला आहे. अशा शिक्षकांच्या पाठीशी संघटना नेहमीच उभी राहिली आहे. त्यामुळे संघटना ही शिक्षकांचा वाली असल्याचे मत माध्यमिक शिक्षक संघटनेचे बी. डी. पाटील यांनी चंदगड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेने हलकर्णी (ता. चंदगड) येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या माध्यमिक शिक्षकांच्या मेळाव्यात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बी. एस. खामकर होते. यावेळी श्री राम विद्यालय कोवाडचे प्राचार्य ए. एस. पाटील यांच्या जादूचे चौकोन या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
मेळाव्याला कोल्हापूर (महानगर) माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आणि 'क्रांतिकारी शिक्षकचे' संपादक राजेश वरक यांनी शिक्षकांचे हक्क आणि कर्तव्य,  व्ही. डी. साठे यांनी संघटना सबलीकरण खामकर यांनी २००५ पेन्शन योजना,  श्री. खपत यांनी `संघटना का आणि कशाला? या विषयावर विचारमंथन केले.` एस. डी. पाटील यांनी सर्व शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी व्ही. जी. तुपारे,  आर. आय. पाटील, रवींद्र देसाई,  एम. बी. पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी. बी. पाटील यांच्यासह विविध शाळातील मुख्याध्यापक, शिक्षक, चंदगड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी स्वागत व प्रास्तविक रवींद्र देसाई यांनी  केले. सुत्रसंचालन एम. व्ही. कानूरकर तर आभार एस. एल. बेळगावकर यांनी मानले.


No comments:

Post a Comment