चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने झोडपले, ऊसतोड मजुरांच्या झोपडीत शिरले पाणी - चंदगड लाईव्ह न्युज

05 December 2018

चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने झोडपले, ऊसतोड मजुरांच्या झोपडीत शिरले पाणी

हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथे पावसाने ऊसतोड मजुरांच्या झोपड्या उडून गेल्यामुळे संसारोपयोगी साहित्य भिजले.

 चंदगड / प्रतिनिधी
आज दुपारी अचानक चंदगड तालुक्यातील हलकर्णी, कारवे, अडकूर परिसरात अवकाळी पावसाने झोडपल्याने नागरीकांची धावपळ झाली. सायंकाळी साडेचार ते साडेपाच असा सुमारे तासभर पाऊसाने झोडपून काढले.
दिवसभर ढगाळ वातावरण होते. वातावरणात उष्माही जाणवत होता. सायंकाळी चारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला. आकाशात काळे ढग जमून अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. अडकूर, हेरे, गवसे, इब्राहिमपूर, अडकूर, सातवणे, केरवडे, सोनारवाडी, लक्कीकट्टे, लाकुरवाडी, माणगाव, डुक्करवाडी, हलकर्णी, कार्वे, यशवंतनगर, तुर्केवाडी, नागणवाडी, दाटे, नरेवाडी, पाटणे फाटा, कोवाड, कागणी, कालकुंद्री, कुदनुर, निटूर, किटवाड गावांच्या परिसरात सायंकाळी साडेचार नंतर मेघगर्जनेसह पाऊस झाला. या परिसरात अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी वर्ग शेतातील काम अर्धवट टाकून घरी आला. ऊसतोड करणाऱ्या मजुरांना मात्र भिजावे लागले. वादळामुळे हलकर्णी फाट्यावरील ऊसतोड मजुराच्या झोपड्या उडून गेल्या. या पावसाने गवताचे (करड) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गवत भिजल्याने जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अचानक आलेल्या या पावसाने शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली. आज अडकूरचा आठवडी बाजार असल्याने व्यापारी वर्ग व ग्राहकांचीही धावपळ झाली. या परिसरात गवत कापणी मोठया प्रमाणात चालू आहे. हि जनावारांची वैरण पावसामध्ये भिजल्याने नुकसान झाले. हा पाऊस काजू, आंबा, ऊसासह मका, वाटाणा, मसुर, हरभरा या पिकांना लाभदायक ठरला आहे. हलकर्णी, यशवंतनगर, माणगाव परिसरातील ऊसतोड थांबल्या आहेत.

पावसाची व्हीडीओ पाहण्यासाठी आमच्या Chandgad Live News या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा - https://www.youtube.com/watch?v=bjFAn9WZJZM


No comments:

Post a Comment