![]() |
अडकूर (ता. चंदगड) येथे गुरुजी मला बी शाळेत घ्या की, अशी आर्त हाक देणारा दिपक, ऋषिकेश, दुर्गा, स्वप्ना व विकास हि ऊसतोड मजुरांची मूले.
|
संजय पाटील / अडकूर
गुरूजी गुरूजी मला बी शाळत घ्या की, सिझन चालू हाय म्हणून इकड आलोया, एक महिना झाला शाळा बगितली नाय, परत कधी शाळेत जाईन ठावं न्हाय, तूमच्या शाळेत तरी घेवा की अशी आर्त हाक अडकूर (ता. चंदगड) येथे आलेल्या ऊसतोड मजुरांच्या मुलांनी दिली आहे. मुले पालकांना शाळेत जाण्यासाठी आग्रह धरत आहेत. मात्र कोणतीही कागदपत्रे नसताना मुलांना शाळेत प्रवेश मिळणार नसल्याने पालक चिंतेत आहे.
अडकूर येथे जालना जिल्हातून ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आल्या आहेत. या टोळी सोबत त्यांची प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये शिकणारी लहान मुले पण आली आहेत. जवळपास चार महिने ही मुले शाळेपासून दुर राहणार आहेत. परिसरात कोणतीही साखर शाळा उपलब्ध नसल्याने या मुलांचे शिक्षण खंडीत झाले आहे. आई - वडिल ऊसाच्या फडात काम करत असताना ही लहान मूले हातात टायर घेऊन दिवसभर खेळतात. मोठी भावंडे लहान भावंडांचा सांभाळ करतात. कुडकुडणाऱ्या थंडीतही अंगात मोजकेच कपडे तर पायात चप्पलांचा पत्ताच नाही. अशी मुले ऊसाच्या फडाकडे जाताना वाटेत शाळा दिसली की थांबून गुरूजी मला बी शाळेत घ्या की? असा प्रश्न शिक्षकांना विचारतात. दिपक नवले हा दूसरीमध्ये, ऋषिकेश खिलवडे हा चौथीमध्ये, दुर्गा खिलवडे अंगणवाडीमध्ये, स्वप्ना गोटमारी पहिलीत तर विकास नवले हा चौथीत शिकत आहे. या मुलांना शाळेत जायचे आहे. पण इतर काही अडचणीमध्ये ती शाळेत येवू शकत नाहीत. सध्या ही मुले येथील माध्यमिक शाळेसमोर रहायला आहेत. पण येथे पाचवीपासून पुढील वर्ग उपलब्ध असल्याने मुलांना प्रवेश देण्यात अडचण आहे. गावामध्ये प्राथमिक शाळेत प्रवेश दिल्यास या मुलांला शिक्षणाची संधी मिळू शकेल. सध्या मात्र ही मुले शाळेपासून वंचित आहेत. या मुलांना गोवर रुबेलाची लस ही मिळाली नाही. शिक्षण व आरोग्य विभागाने याची नोंद घेऊन या विद्यार्थ्यांना शाळा व आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. प्रशासकीय पातळीवर या गोष्टीची दखल घेवून या मुलांच्या शिक्षणाची सोय करणे गरजेचे आहे. सध्या मात्र ही मुले कोणी शाळेत घेता का शाळेत अशी आर्त हाक देत आहेत.
![]() |
संजय पाटील, अडकूर प्रतिनिधी |
No comments:
Post a Comment