होसूर घाटात कोसळलेल्या ट्रक मधील सिमेंटवर डल्ला - चंदगड लाईव्ह न्युज

11 December 2018

होसूर घाटात कोसळलेल्या ट्रक मधील सिमेंटवर डल्ला

होसूर घाटातील अपघातग्रस्त झालेला  ट्रक.
अशोक पाटील, कोवाड 
कोवाड ते बेळगाव रस्त्यावरील होसुर (ता. चंदगड) येथील घाटात सोमवारी दुपारी कोसळलेल्या ट्रकमधील सिमेंटच्या पिशव्यांवर अनेकांनी डल्ला मारला. अपघाताचे गांभिर्य विचारात न घेता रातोरात दोनशे सिमेंट पिशव्या चोरून नेल्याने ट्रक मालक हताश झाला आहे. पोलीसांनी या चोरीचा छडा लावून सामाजीक संवेदनशिलता जीवंत ठेवावी अशी मागणी होत आहे.
सोमवारी दुपारी कर्नाटकातील गुलबर्गा येथून सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक (एम. एच. 09, बी. सी. 1924) होसुर मार्गे चंदगडला निघाला होता. पण होसुर घाटात चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक घाटातील ओढ्यावर पलटी झाला. यामध्ये चालकासह तिघेजण जखमी झाले. जखमी यावर बेळगाव येथील हॉस्पिटलमध्ये  उपचार सुरू असताना  सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तीनी ट्रकमधील सिमेंटवर डल्ला मारला. ट्रकमधून बाहेर ओढयात पडलेल्या सिमेंटच्या पिशव्या उचलून नेल्या. तसेच  पलटी झालेल्या  ट्रकचे दरवाजे फोडून उर्वरित सिमेंट पिशव्या लंपास केल्या. ट्रक मालकाला याचा जबर धक्का बसला आहे. गाडीचे नुकसान झाले असताना सिमेंटचीही चोरी झाल्याने हताश झालेल्या ट्रक मालकाने पोलीसांकडे धाव घेतल्याचे समजते. या मार्गावर अपघात झाल्यानंतर अपघातग्रत वस्तूंची लुट करणारी कांही सराईत मंडळी या मार्गावर आहेत. पोलीस या घटनेची गांभिर्याने दखल घेऊन चोरीचा छडा लावणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

अपघातग्रस्त ट्रकमधील सिमेंटची चोरी झालीच पण अपघात झाल्यानंतर सर्वांच्या समोर काही सुज्ञ लोक डिझेल टॉकीतील डिझेल काढून घेऊन जात होते. हा प्रसंग पाहून अनेकानी संताप व्यक्त केला. पण एकानेही याला विरोध केला नाही.
अशोक पाटील, कोवाड प्रतिनिधी
 

No comments:

Post a Comment