कोवाड ते माणगाव रस्त्याच्या रुंदीकरणाची प्रवाशांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2018

कोवाड ते माणगाव रस्त्याच्या रुंदीकरणाची प्रवाशांची मागणी




कोवाड / प्रतिनिधी             
कोवाड ते माणगाव या रस्त्याचे गेल्या महिन्याभरापासून बांधकाम सुरू आहे. रस्त्याचे रुंदीकरण होत असल्याने लोकांच्यातून समाधान व्यक्त होत असले तरी या मार्गावरील शिवनगे, म्हाळेवाडी, घुल्लेवाडी, निट्टूर या गावातील रस्त्याचा रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न प्रशासनासमोर उभे राहिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावांतर्गत रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावल्यास या मार्गावरील वाहतूक सुरक्षित होणार आहे.
कोवाड ते माणगाव या रस्त्याच्या बांधकामासाठी अर्थसंकल्पीय बजेटमधून तीन कोटी 38 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. शिवपार्वती कन्स्ट्रक्शन कंपनीने कामाचा ठेका घेतला आहे. 3.75 मीटर रुंदीचा रस्ता आता 5.50 मीटर रुंदीचा होणार आहे. गेल्या महिनाभरापासून रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आहे. तालुक्याला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणाची गरज होती. गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या मजबुतीकरणासह रुंदीकरणाची मागणी होती. रस्त्यावरीन वाढती रहदारी व वाहतुकीची कोंडी विचारात घेऊन शासनाने रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. एक पदरी असणारा हा रस्ता आता दुपदरी होत आहे. त्यामुळे वाहनधारकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. पण शिवनगे, म्हाळेवाडी, घुल्लेवाडी व निट्टूर या गावातून जाणारा रस्ता निमुळता आहे. गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांना वाहतुकीचा धोका आहे. घर रस्त्याला लागून असल्याने वाहतुकीची सतत कोंडी होते. रस्त्यावरील अतिक्रमणे काढल्याशिवाय वाहतूक सुरक्षित होणार नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. रस्त्याला लागून घरे असल्याने यापूर्वी वाहने घरात घुसून अपघात झाले आहेत. त्यामुळे रुंदीकरणाची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याचा गांभीर्याने विचार करून गावांतर्गत रस्त्याचे रुंदीकरण करावे अशी मागणी होत आहे.


No comments:

Post a Comment