कोवाड / प्रतिनिधी
हुंदळेवाडी (ता. चंदगड) सारख्या खेड्यातून कबड्डीचे धडे घेतलेल्या सिध्दार्थने प्रो-कबड्डीत डंका निर्माण करुन देशवाशीयांचे लक्ष वेधले. अखेरच्या सामन्यापर्यंत धनकेबाज खेळ करुन सिध्दार्थने धबदबा निर्माण केला होता. त्यामुळे कबड्डी क्षेत्रात सिध्दार्थ देशाचे नाव उंचावेल, असा विश्वास आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी व्यक्त केला. हुंदळेवाडी (ता. चंदगड) येथे आयोजित केलेल्या सिध्दार्थच्या नागरी सत्कार प्रसंगी आमदार कुपेकर बोलत होत्या. अध्यक्षस्थांनी महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर होते. यावेळी डॉ. नंदाताई बाभूळकर, जिल्हा परिषद सदस्य कल्लापा भोगण पुणे नगरसेवक बाबूराव चांद्रे उपस्थित होते. प्रो-कबड्डीच्या सहाव्या मोसमात यु मुम्बा संघात सिध्दार्थने अष्टपैलू कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधल्याने आमदार कुपेकर यांच्या हस्ते सिध्दार्थचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पुणेरी फलटनचा खेळाडू अक्षय जाधव व सिध्दार्थचा भाऊ सुरज देसाई यांचाही सत्कार करण्यात आला. आमदार कुपेकर म्हणाल्या, “हुंदळेवाडी व किणीच्या मातीत तयार झालेला सिध्दार्थ ध्येय समोर ठेवून खेळत गेल्याने कोल्हापूरच्या वैभवात भर पडली आहे. कबड्डीचे वेड असल्याने तो नोकरीत कधी रमला नाही. चार वर्षापूर्वी नोकरी सोडून कबड्डीच्या खेळाकडे वळला. अनेकवेळा अपयश आले पण धीराने परिस्थितीशी दोन हात करत प्रो कबडीत पहिल्या तीन खेळाडूत स्थान मिळविले."
सत्काराला ऋतज्ञता व्यक्त करताना सिध्दार्थ देसाई म्हणाला, ''कबड्डीत करियर करण्याचा निश्चय करुन मी माझी वाटचाल चालू ठेवली होती. पण सततच्या अपयशाने नैराश्य आले होते. कबड्डी सोडून देण्याच्या विचारात होतो. पण भावाने पाठबळ दिले. प्रयत्नात सातत्य राहिले तर यश नक्की मिळेल, असा संदेश दिला होता. त्यामुळेच आजचा हा दिवस पहायला मिळाला मुख्याध्यापक व्ही. एन. देसाई यांनी प्रास्ताविक केले. अविनाश देसाई व सरपंच अश्विनी कांबळे यांनी स्वागत केले. यावेळी बाबूराव चांद्रे, डॉ. नंदाताई बाभूळकर, विष्णू जोशिलकर, गुंडोपंत देसाई, कलापा भोगण यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला एम. जे. पाटील, उपसरपंच विष्णू आडाव, सुजाता पाटील, रुपा साडेकर, नंदिनी पाटील, वसंत सुतार, वसंत जोशिलकर, जनार्दन देसाई, शिरीष देसाई, सविता देसाई उपस्थित होते. सुभाष बेळगांवकर यांनी सुत्रसंचालन केले. नंदकुमार बेळगांवकर यांनी आभार मानले.
वाद्यांच्या गजरात मिरवणूक...
स्पर्धा संपल्यानंतर आज सिद्धार्थ पहिल्यांदाच हुंदळेवाडीत आला. त्यामुळे ग्रामस्थांतर्फे त्याच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. कबड्डी क्षेत्रातील सर्वांचा चाहता बनलेल्या सिध्दार्थला पाहण्यासाठी कोवाड परिसरात लोकानी सकाळपासून गर्दी केली होती. कोवाड येथील दुर्गामाता मंदिर ते सिध्दार्थच्या घरापर्यंत वाद्यांच्या गजरात सजविलेल्या जिप्सी गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत जयप्रकाश विद्यालयाचे ढोल, ताशा तसेच लेझीम मंडळाने सहभाग घेतला होता.
सिद्धार्थ देसाईची मिरवणुकीवेळी लोकांनी केेलेली गर्दी. |
No comments:
Post a Comment