चंदगड / प्रतिनिधी
२५ जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधुन चंदगड तहसिलदार कार्यालयाकडून २७ जाने ते १० फेब्रुवारी २०१९ अखेर लोकशाही पंधरावडा म्हणुन साजरा करण्यात येणार असल्याची माहीती तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी दिली.
२५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन तहसिलदार कार्यालयात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्याने चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी प्रभात फेरी काढून मतदार जागृतीसाठी मोहीम राबवली. २६ जानेवारी रोजी तहसिलदार कार्यालयात राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. २७ जानेवारी ते १० फेब्रुवारी अखेर राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्याने "लोकशाही पंधरावडा" म्हणून तहसिलदार कार्यालयात साजरा करण्यात येणार आहे. २७ जानेवारी रोजी जनजागृती करून मतदार संख्या वाढवण्यासाठी करावयाची उपाय योजना, "लोकशाही, निवडणूक व सुशासन"याबाबत चर्चा करण्यासाठी तालुक्यातील राजकीय पुढारी, पक्ष प्रमुख, प्रतिष्ठीत नागरिक यांचे चर्चासत्र तहसिलदार कार्यालयात आयोजित केले आहे. दि २८ जानेवारी रोजी तालुक्यातील युवक युवतीना मतदानाचा अधिकाराबाबत जागृती करून प्रोत्साहीत करण्यासाठी भर द्यावी, या अनुषंगाने शाळा महाविद्यालयात भेटी देवुन व्हीव्हीपीएटीची प्रात्यक्षिकाद्वारे माहीती देणे, २९ जानेवारी निबंध स्पर्धा, ३० जानेवारी वक्तृत्व स्पर्धा, ३१ जानेवारी रोजी रांगोळी, मतदार जागृती पथनाट्य स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.
२ फेब्रुवारी रोजी मतदार पुरवणी गावचावडी येथे वाचन, यामध्ये नाव कमी करणे, नांव घालणे, दुरूस्तीबाबत अर्ज स्विकारणे. ३ फेब्रुवारी रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा, ४ फेब्रुवारी रोजी व्हीव्हीपीएटी जनजागृती फेरी व प्रात्यक्षिक, ५ फेब्रुवारी रोजी लोकप्रतिनिधींनी दिलेल्या वचनपूर्तीच्या अनुषंगाने खुलामंच-खुली चर्चा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आयोजीत करण्यात येणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी हायस्कूल, महाविद्यालयात रॅली काढून, लोकशाही, निवडणूक व सुशासन याबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजन केले आहे. ७ फेब्रुवारी रोजी प्रत्येक केंद्रातील नवविवाहीत महीला यांची मतदार नांवनोंदणी अभियान राबवण्यात येईल. ८ फेब्रुवारी रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मतदार यादीत नाव समाविष्ठ करण्यासाठी अर्ज भरून घेणे, ९ फेब्रुवारी रोजी बचत गटातील महीलांचा मेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रम तर १० फेब्रुवारी रोजी मतदार पुनरिक्षण कार्यक्रमात चांगली कामगीरी केलेल्या मतदान केंद्रीस्तरावरील अधिकारी, पर्यवेक्षक, निवडणुक कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे. या जनजागृती पंधरवड्याचे आयोजन तहसिलदार शिवाजी शिंदे यानी नायब तहसिलदार दत्तात्रय नांगरे, निवडणूक शाखा अव्वल कारकून प्रकाश जाधव, लिपीक शाम तरवाळ यांच्या सहकार्याने पार पाडले जाणार आहे.
No comments:
Post a Comment