मांडेदुर्ग येथे सोमवारी कुस्ती मैदानाचे आयोजन, आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र होणार सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2019

मांडेदुर्ग येथे सोमवारी कुस्ती मैदानाचे आयोजन, आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र होणार सुरू

संग्रहित छायाचित्र

मजरे कार्वे / प्रतिनिधी
मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील शिवशाहू कला व सांस्कृतिक मंच व जय हनुमान तालीम मंडळाच्या वतीने भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे. सोमवारी 14 जानेवारी 2019 रोजी दुपारी तीन वाजता मांडेदुर्ग क्रिडा नगरीत या स्पर्धा होणार आहेत. चंदगड तालुक्यातील युवकांमधील क्रीडा क्षमतेला आधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व सुविधा उपलब्ध करून चंदगड तालुक्याच्या लाल मातीचा ठसा आपल्या क्रीडा कर्तुत्वाने जगभर उमटवण्यासाठी क्रीडानगरी मांडेदुर्ग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा प्रशिक्षण केंद्र उभारले जात आहे. येथील मारुती नाना पवार यांच्या प्रेरणेने आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पै. राम पवार व पै. लक्ष्मण पवार हे प्रशिक्षण केंद्र सुरू करीत आहेत. त्यानिमित्ताने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे.
चंदगडच्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर, शिवसेना नेते प्रभाकर खांडेकर, सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यान्नावर यांच्या यांच्‍या हस्‍ते या मैदानाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र केसरी व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विष्णू जोशीलकर असतील. यावेळी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, भाजपाचे नेते गोपाळराव पाटील, नंदाताई बाभुळकर, संभाजीराव शिरोलीकर, राजेश पाटील, ज्योतीताई पाटील, तहसीलदार शिवाजीराव शिंदे, पोलीस निरीक्षक शिवप्रसाद यादव, शिवाजी पाटील, गोपाळ गुरव, सभापती बबन देसाई, भाजप नेते रमेश रेडेकर, विठ्ठल पेडणेकर, जे. बी. पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन होणार आहे.
या कुस्ती मैदानामध्ये गोकाकचा कर्नाटक केसरी पैलवान विनोद बडकुंद्री व कोल्हापूरचा महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान कृष्‍णांत सावंत यांच्यात प्रथम क्रमांकाची लढत होणार आहे. कोल्हापूरचा नॅशनल चॅम्पियन पैलवान सुशांत पाटील व बेळगावचा कर्नाटक कुमार पैलवान शिवानंद आमणगी यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची लढत होणार आहे. खानापूरचा नॅशनल चॅम्पियन पैलवान आनंद हालसी व बेळगावचा नॅशनल चॅम्पियन पैलवान हरिश्चंद्र बेळगुंदी यांच्या तृतीय क्रमांकाची लढत होणार आहे. त्याचबरोबर चंदगड तालुक्यातील व सीमा भागातील तसेच कोल्हापूर, सातारा इत्यादी भागातील नामांकित पैलवानांच्या कुस्त्या पाहावयास मिळणार आहेत. स्पर्धेचे विशेष आकर्षण महिलांच्या कुस्तीचे असणार आहे. यामध्ये नरेवाडी, गडहिंग्लजची पैलवान समृद्धी निलवे व पैलवान शीतल पाटील यांच्यात प्रथम क्रमांकाची, पै. श्रेया पाटील व पै. अमुल्या  यांच्यात द्वितीय क्रमांकाची तर पै. लक्ष्मी व पै. स्वाती त्यांच्यात तृतीय क्रमांकाची कुस्ती होणार आहे. तरी या कुस्ती मैदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment