चंदगड येथील तहसीलदारांना निटूर रस्ता प्रश्नी निवेदन देताना ग्राहक सेना तालुकाध्यक्ष राजीव रेडेकर, शाखाप्रमुख अशोक पाटील, हनुमंत पाटील, विश्वास पाटील, शंकर मुडेकर, मारुती पाटील आदी. |
कोवाड-माणगाव मार्गावरील निटूर ता. (चंदगड) गावातील धोकादायक चढणीचा वळण रस्ता प्रश्नी शिवसेना शाखा व ग्रामस्थांनी १३ रोजी पुन्हा रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. गावातील बस थांबा ठिकाणी तीव्र उतार व धोकादायक वळण असलेला रस्ता गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्थेत आहे. उतार कमी करून रस्त्याचे रुंदीकरण करावे. यासाठी शिवसेना शाखा नेतृत्वाखाली एक वर्षापूर्वी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून माणगाव-चंदगड मार्ग रोखून धरला होता. त्यावेळी संबंधित बांधकाम विभागाकडून मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. तथापि दोन वर्षे होत आली तरी आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे दिनांक 13 रोजी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार चंदगड यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
गतवर्षी या वळणावर ऊसाने भरलेला ट्रक ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने घरात घुसून घरांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचबरोबर येथील रस्त्यावर असलेल्या विजेच्या खांबाला धडकून अनेक वाहनांना अपघात झाले आहेत .गेल्या काही वर्षात शेकडो अपघातांची मालिकाच सांगता येईल .येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालक, पादचारी , शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते .रस्ता रुंदीकरणासह पर्यायी रस्त्याची गेल्या अनेक वर्षात आश्वासनेच मिळाली असून पूर्तता न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी पुन्हा रास्ता रोकोचा इशारा दिला आहे . निवेदनात रस्त्यासह माणगाव रस्ता रुंदीकरणात एकाच बाजूच्या शेतकऱ्यांवर झालेला अन्याय, धोकादायक विजेचा खांब तात्काळ बदलणे , सांडपाण्याचा निचरा आदी मागण्यांचाअंतर्भाव आहे. निवेदनावर शाखाप्रमुख अशोक पाटील यांचेसह विश्वास पाटील रवींद्र रवींद्र पाटील हनुमंत पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment