तुडये येथे शिवजयंतीनिमित्त कुस्ती स्पर्धेत सांगलीच्या नाथा पालवेची बाजी - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2019

तुडये येथे शिवजयंतीनिमित्त कुस्ती स्पर्धेत सांगलीच्या नाथा पालवेची बाजी

तुडये (ता. चंदगड) येथे आयोजित कुस्ती स्पर्धेतील एक अटीतटीचा क्षण.
तुडये / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील तुडये येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवजयंतीचे औचित्य साधून रामलिंग आखाड्यात निकाली कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत सांगलीच्या पवार तालमीचा मल्ल नाथा पालवे यांने दिल्लीच्या मल्ल अशोककुमारचा आखाडी डावावर केवळ सहा मिनिटात परभाव केला. हि कुस्ती खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते लावण्यात आली होती. मैदानात मानधनधारी 75 निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.
चंदगड तालुक्यातील तुडये येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त व शिवजयंतीचे औचित्य साधून निकाली कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले,``महाराष्ट्रात कुस्तीचा सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. शिवजयंती रोजीच माझ्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदान होत आहे. आमच्या घराण्यातच कुस्तीची परंपरा आहे. आपण मातीच्या ढेकळात 50 रु बक्षिसे मिळवत अनेक पुरस्कार मिळवत कुस्त्या केल्या. आगामी दोन महिन्यांत होणाऱ्या लोकसभेच्या आखाड्यात मी शड्डू ठोकून ऊभा आहे. गेली पाच वर्षे खासदारकीचा आखाडा उत्कृष्ट पणे गाजवला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकही आपण गाजवणारा अशी आशा व्यक्त केली.`` यावेळी प्रथम क्रमांकाची कुस्ती खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते लावण्यात आली. यामध्ये सांगलीच्या पवार तालमीचा मल्ल नाथा पालवे यांने दिल्लीच्या मल्ल अशोककुमारचा आखाडी डावावर केवळ सहा मिनिटात चितपट केले. तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर यांच्या हस्ते लावण्यात आली. यामध्ये सांगलीचा मल्ल असिफ मुल्ला यांने दिल्लीचा मल्ल अमितकुमारला निकाली डावावर केवळ चार मिनिटात चितपट केले. यावेळी मैदानात 75 मानधनवार कुस्त्या लावण्यात आल्या.

यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, डॉ. नंदाताई बाबुळकर, के. जी. पाटील, उद्योजक शामराव बेनके, माजी सभापती शांताराम पाटील, निंगो गुरव, मोहन परब, अजित व्हन्याळकर, मायाप्पा पाटील, महादेव सांबरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. जोतिबा चांदिलकर,परशराम गुरव, परशराम इटगी, कल्लाप्पा पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. कृष्णा चौगले-राशिवडेकर यांनी उत्कृष्ट समालोचन केले. मैदानात सुमारे 15 हजार कुस्ती शौकीनानी उपस्थिती लावली होती.

No comments:

Post a Comment