मानवता जोपासणे हाच खरा माणुसकीचा संदेश – एम. पी. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2019

मानवता जोपासणे हाच खरा माणुसकीचा संदेश – एम. पी. पाटील

चंदगड - माडखोलकर महाविद्यालयात `व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्यप्राप्ती` या विषयावरील कार्यशाळेत बोलताना एम. पी. पाटील. शेजारी प्राचार्य डॉ. पाटील व इतर. 
चंदगड / प्रतिनिधी 
अंधानुकरण टाळा आणि चांगल्या संस्काराची कास धरा. आंधळ्या परंपरांच्या पाठीमागे लागून वाम मार्गाने भरकटत चाललेल्या नव्या पिढीला योग्य दिशा द्या. त्यांच्यामध्ये भारतीय संस्कृतीचे महान संस्कार बीजरोपण करा. तरच आपला व्यक्तिमत्व विकास चांगला होईल. आपल्याकडील उपयुक्त कौशल्याच्या आधारावर जीवनाचे योग्य ध्येय गाठू शकाल असे प्रतिपादन एम. पी. पाटील यांनी केले. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या भाषा विभागाच्या वतीने आयोजित `व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्यप्राप्ती` या विषयावर कार्यशाळेत ते बोलत होते. 
श्री. पाटील पुढे म्हणाले ``संगत आणि पंगत यातला फरक योग्य वेळी ओळखता आला पाहिजे. सज्जनांच्या विद्वानांच्या संगतीने व्यक्तिमत्व घडते तर दुर्जनामुळे बिघडते. जीवनात वेळ सर्वात महाग आहे. वेळेचा सदुपयोग करा. देशाभिमान, पर्यावरण विकास साधा. थोरामोठ्यांची चरित्रे वाचा. स्वप्ने मोठी बघा, पेराल ते उगवेल त्यावर योग्य घटकांचे सिंचन अत्यावश्यक आहे. प्राचार्य डॉ. पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याचे कार्य महाविद्यालयीन जीवनातच होते. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उज्वल भविष्याची वाटचाल करा. मतदानाचा टक्का वाढवून योग्य उमेदवार निवडून द्या असे संदेश दिला. प्रा. एस. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. एस. के. सावंत, डॉ. ए. वाय. जाधव, प्रा एस. डी. गावडे, डॉ. एस. डी. गोरल, प्रा. ए. डी. कांबळे, एन. के. पाटील यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. एस. बी. दिवेकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

No comments:

Post a Comment