दौलत कारखाना तालुका संघाला चालवायला द्या - सभासद संघटनेचे हसन मुश्रीफांना पत्र - चंदगड लाईव्ह न्युज

09 February 2019

दौलत कारखाना तालुका संघाला चालवायला द्या - सभासद संघटनेचे हसन मुश्रीफांना पत्र


चंदगड / प्रतिनिधी 
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाला सहकारी तत्त्वावर चालवायला द्यावा अशी मागणी दौलत कारखाना सभासद संघटनेच्या वतीने जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
दौलत कारखाना चालवायला देण्यासंदर्भात जिल्हा बँकेने काढलेल्या निविदेला चंदगड तालुका खरेदी विक्री संघ व कोल्हापूर येथील अथर्व ट्रेडिंग कंपनीने प्रतिसाद दिला. दोनच निविदा आल्याने दौलत कारखाना कोणाला चालवायला द्यायचा हा प्रश्न आहे. यापूर्वी दौलत तासगांवकर शुगर्स व न्युट्रीयन्स् कंपनीला चालवायला दिल्यानंतर या दोन कंपन्यांनी शेतकरी, कामगार, तोडणी-ओढणी व वाहतूकदार यांची बिले थकीत ठेवली. दोन वेळा बाहेरील कंपन्याचा वाईट अनुभव आल्याने जिल्हा बँकेने तिसऱ्या कंपनीला देऊन शेतकरी व कामगार यांना पुन्हा कर्जाच्या खाईत लोटू नये. त्याएवजी तालुका संघाला तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी सभासद मदत करण्यासाठी तयार आहेत. जिल्हा बँकेचे कर्ज फेडण्यासाठी तालुक्यातील सेवा संस्था दूध संस्था व वैयक्तिक स्वरूपात सर्वजण तालुका संघाकडे ठेवी ठेवून सहकार्य करणार आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने तालुका संघाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तालुका संघावर विश्वास ठेवून दौलत कारखाना चालवला द्यावा अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.


No comments:

Post a Comment