चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या ज्ञानेश्वर महाजन याचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील. शेजारी प्राध्यापक वर्ग. |
चंदगड / प्रतिनिधी
ईस्लामपूर (पेठ) येथे नुकत्याच झालेल्या पश्चिम महाराष्ट्र त्रिमुर्ती केसरी कुस्ती स्पर्धेत येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचा विद्यार्थी ज्ञानेश्वर साहेबराव महाजन (बी. ए. भाग – 1) याने सुवर्ण पदकाचा बहुमान पटकावला. तो चंदगड येथील चाणक्य अकादमीचा पैलवान आहे. स्पर्धा परीक्षेसाठी तो विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता चाचणी मार्गदर्शक म्हणूनही काम पाहतो. 66 किलो वजन गटातील माती विभागातून त्याने हे पदक मिळवले.
चंदगड येथील बाळकृष्ण शंकर गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कसून सराव केला व कुस्तीतील डावपेचांचे धडे गिरवले. आजवर त्याने अनेक कुस्ती स्पर्धातून सहभाग घेतला आहे. कुमार केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन, महापौर केसरी आदी स्पर्धेत त्याने यश मिळविले. प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या व मनमिळावू स्वभावाच्या ज्ञानेश्वरचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांच्या हस्ते त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्याने कुस्ती या देशी खेळाच्या जोपासनेची गरज व्यक्त केली. यावेळी प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, ``आधुनिक व्यायाम साधने, खुराक, प्रशिक्षण यासाठी खर्च येतो. ज्ञानेश्वरला वेळेवर आर्थिक मदत मिळाल्यास एका गुणी मल्लाच्या कौशल्याला वाव मिळेल. त्याची कारकिर्द बहरेल. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, हितचिंतक यांनी त्याला मदत करण्याची गरज आहे.`` यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment