चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात पदवीदान कार्यक्रमावेळी पदवी प्रमाणपत्रा वितरण करताना माजी प्राचार्या माधुरी शानभाग, प्राचार्य डॉ. प्रविण चौगुले, प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, प्रा. पी. एल. भादवणकर. |
चंदगड / प्रतिनिधी
आयुष्यभर स्वतः मधील विद्यार्थी वृत्ती टिकवणे हे व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहे. स्वतःमधील ज्ञान कौशल्यांचा योग्य वापर केला पाहिजे. बदलत्या काळाने अनेक संधी द्वारे खुली केली आहेत. शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवणे, सामाजिक स्वास्थ्य टिकविणे व सद्गुणांची जोपासना करून वृत्तीला अध्यात्मिक वळण देणे, परिपूर्ण व्यक्तिमत्त्वस पूरक ठरणारे आहे. आपल्यातील ऊर्जेला योग्य दिशा देऊन विद्यार्थ्यांनी राष्ट्र विकासास हातभार लावावा, स्वतःबरोबर समाज व देशहिताचा विचार करावा असे प्रतिपादन बेळगाव येथील जी. एस. एस. महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या माधुरी शानभाग यांनी केले. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील पदवीदान सोहळा वेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते.
यावेळी विद्यापीठ निमंत्रित प्रतिनिधी प्राचार्य डॉ. प्रविण चौगुले यांनी पदवी हे साधन आहे. साध्य नव्हे याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान भांडाराच्या जोरावर कर्तुत्वाची नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करावीत असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, सहिष्णुतेचा अंगीकार करावा, स्वतःच्या क्षमतांचा विधायक वापर करावा व तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवाव्यात असे आवाहन केले. महाविद्यालयात प्रथम क्रमांक आलेल्या नम्रता गावडे हिला महाविद्यालयाच्या ध्वजाच्या मान देण्यात आला. कार्यक्रमाला सौ. विद्या बांदिवडेकर, ॲड. बांदिवडेकर, एस. पी. बांदिवेडकर, विक्रांत बांदिवडेकर, ए. जी. बोकडे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. एस. के. सावंत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ए. डी. कांबळे व सौ. एस. बी. दिवेकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिव प्रा. डॉ. पी. एल. भादवणकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment