चंदगड शहरामध्ये वाहतूकीची कोंडी कायम, पार्किंग व्यवस्था व वाहतुक नियंत्रकांची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

19 March 2019

चंदगड शहरामध्ये वाहतूकीची कोंडी कायम, पार्किंग व्यवस्था व वाहतुक नियंत्रकांची गरज

चंदगड शहरात वाहतुकीची कोंंडी नित्याचे बनले आहे.
अनिल धुपदाळे / चंदगड
चंदगड शहरातील वाढती रहदारी व पार्किंगचा अभाव यामुळे वाहन चालकांना नव्हे तर पादचाऱ्यांना याचा त्रास सहन आहे. शहरातील छत्रपती संभाजी चौक व बँक ऑफ इंडिया या दोन ठिकाणी तर वाहतूकीची सतत कोंडी होत आहे.
चंदगड येथील छत्रपती संभाजी महाराज चौकातुनच शहरात प्रवेश करावा लागतो. या चौकात सकाळी साडे आठ ते नऊच्या दरम्यान ते दुपारी दोन-तीन तसेच सायंकाळी पाच ते सात-आठ वाजण्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी होते. याच प्रमाणे बँक ऑफ इंडिया जवळ तर सतत वाहतुकीची कोंडी होते. बँक ऑफ इंडिया जवळ पार्किंग व्यवस्था नसल्याने प्रामुख्याने दुचाकी धारकांची कुचंबना होते. सद्या बँकेच्या समोरच पार्किंग केले जाते. ये-जा करणारी चारचाकी वाहने समोरासमोर आल्यानंतर दुचाकी धारकांची तारेवरची कसरत होते. काही वेळा वादाचे प्रसंग निर्माण होतात. रस्त्याच्या मानाने वाढती वाहतूक व पार्किंगचा अभाव या कारणामुळे सर्व प्रकारच्या वाहन चालकांना मोठा त्रास होत आहे. छ.संभाजी महाराज चौकात तर वाहतूकीची सतत कोंडी होताना दिसते. पार्किंग व्यवस्था नसल्याने किमान शहरातील दोन्ही ठिकाणी ठराविक वेळेसाठी पोलीस कार्यरत असणे जरुरीचे आहे. छ.संभाजी महाराज चौकात कधीतरी एखादा पोलिस पाहायला मिळतो. मंत्र महोदय, वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्या दिवशी येणार असतील तर त्या दिवशी मात्र पोलीस तैनात पाहायला मिळते. शहरतील वाहतूक कोंडी होवू नये यासाठी नियोजन करून वन वे चे नियोजन करणे जरूर आहे.

No comments:

Post a Comment