हातकणंगले तहसिलदाराना पत्रकार संघटनेकडून विविध मागण्यांसाठी निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2019

हातकणंगले तहसिलदाराना पत्रकार संघटनेकडून विविध मागण्यांसाठी निवेदन

हातकणंगले तहसिलदार सुधाकर भोसले यांना पत्रकारांच्या मागण्याचे लेखी निवेदन देतांना सुधाकर निर्मळे, सुरेश पाटील, अतुल मंडपे , नंदकुमार कुलकर्णी, प्रा. रविंद्र पाटील, युवराज पाटील, सलीम खतीब
हातकणंगले / प्रतिनिधी
पत्रकारांना गृहनिर्माण सोसायटीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, एसटी पास व टोल फ्री पास मोफत द्यावा, पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक व नोकऱ्यांमध्ये राखीव जागा द्याव्यात. यासह प्रमुख मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषद संलग्न कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे हातकणंगले तहसीलदार सुधाकर भोसले याना निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टस् वेल्फेअर असोसिएशचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, सचिव सुरेश पाटील, खजानीस सदानंद कुलकर्णी, कौन्सिल सदस्य अतुल मंडपे, जिल्हा संघटक प्रा. रवींद्र पाटील, युवराज पाटील, सलीम खतीब, आनंदा काशिद,विनायक पाटील यांनी  निवेदन देवून  पत्रकाराच्या अडचणी मांडल्या. 
निवेदनात म्हटले आहे की, मराठी पत्रकार परिषद संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन ही संस्था राज्य पातळीवर काम करीत आहे,  कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकार न्याय व हक्कासाठी निर्भीडपणे लेखन करीत असतात.  वृत्त संकलनाचे काम करणाऱ्या प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील प्रतिनिधींना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.  वास्तव व वस्तुनिष्ठ बातम्या देत असताना निर्भिड लेखणीमुळे धमक्या व मारहाणीच्या प्रसंगांनाही पत्रकारांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी शासनाने पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी कडक कायदे केले पाहिजेत. त्याशिवाय पत्रकारांना एसटी पास तसेच प्रमुख मार्गावरील टोल फ्री पास मोफत मिळावेत, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळावीत,पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक व नोकरीत राखीव जागा देऊन वैद्यकीय सुविधांचा त्यांना लाभ मिळावा, अशा मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.  कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने या मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी आर. जी. पाटील यांनाही देण्यात आले.


No comments:

Post a Comment