तरुणाईची शक्ती विघातक वृत्तीकडे वळत आहे - प्रा. जयप्रभू कांबळे - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2019

तरुणाईची शक्ती विघातक वृत्तीकडे वळत आहे - प्रा. जयप्रभू कांबळे


  मौजे कारवे (ता. चंदगड) येथील सरस्वती वाचनालयामार्फत आयोजित व्याख्यानमालेत व्याख्यान देताना प्रा. जयप्रभू कांबळे.
माणगाव / प्रतिनिधी
जागतिकीकरणाने गावच्या संस्कृतीची नाळ तोडली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी आईची भाषा तोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. घराची खानावळ झाली. भाजी भाकरी पेक्षा आज पिझ्झा , बर्गर मागविला जातोय . सेल्फी , बॅनर आणि स्टेटस हे नवे रोग तयार झाले . तरुणाई विघातक कृतीकडे वळत आहे. घरातील चुल हद्दपार करून धाब्यावर जाऊन चुलीवरची भाकरी खाण्यात प्रतिष्ठा निर्माण झाली .एकंदरीत घराचा बाजार मांडला जातोय. असे प्रतिपादन प्रा. जयकुमार कांबळे यांनी केले.
 मौजे कारवे ( ता. चंदगड ) येथील सरस्वती वाचनालयामार्फत आयोजित व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना 'गाव बदलत आहे ' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दयानंद भोगण होते. दीपप्रज्वलन पी. आर. मांडेकर आणि निंगाप्पा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रकाश दुकळे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय द.य. कांबळे यांनी करून दिला. प्रा. कांबळे पुढे म्हणाले की, 'शेती ही देशाचा कणा होती .त्यावर जागतिकीकरणाने घाला घातला. माणसाचे गोठे निर्माण झाले. लोकसंस्कृतीच्या उपासकांचे जगणे संपुष्टात आले. वारकरी संप्रदायाची चांगली परंपरा असतानाही भोंदूगिरीच्या मागे समाज लागला. माणूस नावाचं रसायन गुढ बनत चाललं आहे. याप्रसंगी सरपंच जोतिबा आपके ,उपसरपंच नंदा चाळूचे ,विद्या मांडेकर , सौ मंगल पाटील , सौ अर्चना पाटील ,राजेंद्र ओमाणा पाटील आणि रमेश नाईक या नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बी . आर .फर्नांडिस ,राजेंद्र पाटील (पोलीस पाटील ) प्रकाश ज्योती दुकळे, शिवाजी भोसले, डॉ . नांदुरकर ,विष्णू कार्वेकर, सूर्याजी ओऊळकर उपस्थित होते .सूत्रसंचालन मधुकर कांबळे तर आभार सुरेश कांबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment