![]() |
हलकर्णी (ता. चंदगड) येथे दौलत चालवायला घेणाऱ्या अथर्व कंपनीला पाठींबा देण्याबाबत चर्चा करताना बैठकीला उपस्थित असलेले कामगार व ॲड. संतोष मळविकर व इतर. |
चंदगड / प्रतिनिधी
शेतकऱ्यांची थकीत बिले देण्याबरोबर ऊसाचे काटा पेमेंट आणि कामगारांची देणी वेळेत देण्याच्या अटीवर दौलत बचाव कृती समिती, कामगार व शेतकरी यांनी अथर्व कंपनीला पाठिंबा दिला आहे. दौलत बचाव कृती समितीच्या वतीने आज हलकर्णी (ता. चंदगड) येथील मंदिरात बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दौलत साखर कारखान्यासाठी जिल्हा बँकेने नव्याने टेंडर काढले होते. यामध्ये अथर्व कंपनी व चंदगड तालुका खरेदी विक्री संघाने टेंडर भरले होते. तालुका संघ यांच्या अटी मान्य न झाल्याने जिल्हा बँकेने अथर्व कंपनीला दौलत 39 वर्षासाठी देण्याची नोटीस बजावली होती. या संदर्भात दौलतचे कामगार व दौलत बचाव कृती समिती यांनी अथर्व कंपनीचे मानसिंग खोराते व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांची देणी, कामगार पगार व बँकेची देणी या संदर्भात चर्चा केली. परिणामी अथर्व कंपनीने साऱ्या अटी मान्य केल्याने आज हलकर्णी येथे बोलावलेल्या बैठकीत दौलत बचाव कृती समिती, कामगार शेतकरी सभासद यांनी दौलत बचाव कृती समितीचे अध्यक्ष यांनी मांडलेल्या विषयांना एकमुखाने अथर्व कंपनीला पाठिंबा देण्याचे मान्य केले. यावेळी दौलत बचाव कृती समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष मळविकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पोवार, राजेंद्र पावसकर, अनिल होडगे यांच्यासह कामगार उपस्थित होते. आभार सुधाकर पवार यांनी मानले.
No comments:
Post a Comment