चंदगडी सोंगातून पारंपारिक पध्दतीचा अविष्कार, संस्कृतीचे जतन - चंदगड लाईव्ह न्युज

02 April 2019

चंदगडी सोंगातून पारंपारिक पध्दतीचा अविष्कार, संस्कृतीचे जतन

चंदगडच्या पारंपारिक सोंगातील काही क्षण.
चंदगड / अनिल धुपदाळे
संपुर्ण महाराष्ट्रात एक वेगळी खासियत असलेल्या चंदगड तालुक्यातील विशेष सांस्कृतिक ओळख म्हणजे पाडव्याच्या अगोदर काढली जाणारी सोंगे. अखंड महाराष्ट्राला चंदगडच्या धुलीवंदन ते पाडव्याच्या गोडव्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. या सणाच्या पारंपरिकतेमध्ये  रामायण, महाभारत, कौरव-पांडव आदी पौराणिक विषयांचे महत्व असणारी सोंगे आवर्जून काढली जातात. 
पारंपरिक पध्दतीने कैक वर्षांपासून सोंग काढण्यासाठी खासकरून चंदगड व चंदगडचा पश्चिम तसेच  दक्षिण-उत्तरेकडील भाग प्रसिद्ध आहे. चंदगड तालुका कोकण विभागाशी संबंधित आहे. भाषेतही बऱ्याचअंशी कोकणी प्रभाव आहे. सण, उत्सवावर कोकणी प्रभाव जाणवतो. खासकरून चंदगडसह कानूर, हेरे, कोदाळी या पश्चिम-ते दक्षिण-उत्तर दिशेच्या सर्व विस्तारीत भागात गुढीपाडव्याच्या आगोदर पाच-सहा दिवस विविध प्रकारची पौराणिक, सामाजिक तसेच सद्याच्या आधुनिक विषयावर आधारित वैशिष्ट्यपूर्ण सोंग काढली जातात. रामायण, महाभारत यातील काही महत्त्वाचे प्रसंग सादर केले जातात. तसेच सामाजिक स्थितीवर आधारित,आधुनिक काळावर आधारीत  प्रसंग सुद्धा सादर केले जातात. एका सोंगात साधारण आठ ते दहा-बारा व्यक्ती असतात. सोंगतील विषयावर आधारित वेशभूषा - रंगलेपन (मेक-अप) करून सहभागी होतात. प्रामुख्याने रामायण,महाभारतातील प्रसंगाची सोंग डोळ्यासमोर उभे-हुब प्रसंग निर्माण करतात. राम-सीता, रावण, हनुमान, कौरव-पांडव यांच्या भुमिकेत सादर करण्यात येणारी सोंग खास वैशिष्ट्य पूर्ण असतात. चंदगड शहरात पाडव्याच्या अगोदर दोन दिवस तर दिवस -रात्र सोंगांची रेलचेल असते. चंदगड ची ही शेकडो वर्षांच्या परंपरेमुळे चंदगडला विषेश सांस्कृतिक महत्व आहे. वास्तविक चंदगडच्या या पारंपारिक सोंगांची नोंद राज्य स्तरावर होणे आवश्यक आहे. या परंपरेमुळे तसेच आजच्या आधुनिक युगातील परंपरेवर या सोंगाच्या सादरीकरणाच्या माध्यमातून प्राचीन व या आधुनिक युगातील सांगड घालती आहे. यामुळे आजच्या पिढीला परंपरेचे जतन करण्यासाठीचा संदेश ही जातो. त्याचबरोबर आजच्या युगातील  महत्वही स्पष्ट होते. ही पारंपरिक सोंग म्हणजे चंदगडच्या पारंपारिक सांस्कृतिकतेचा अतिउत्तम ठेवा आहे. तो पिढ्यानपिढ्या जतन केला जातोय. मात्र याची शासनदरबारी सांस्कृतिक विभागात याची नोंद केली जाणे गरजेचे आहे. कोकणात सोंग काढली जातात. पण चंदगडी विशेषतः कांही वेगळेच आहे. त्याची नोंद घेतली जात नाही, याची खंत वाटते. शासनाने याची दखल घेऊन चंदगडचे सांस्कृतिक महत्व वाढवावे अशी लोकांतून मागणी आहे. 


No comments:

Post a Comment