तालुका संघाने दौलतबाबतची याचिका मागे घ्यावी – ॲड. संतोष मळविकर - चंदगड लाईव्ह न्युज

06 April 2019

तालुका संघाने दौलतबाबतची याचिका मागे घ्यावी – ॲड. संतोष मळविकर

हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील दौलत बाबतच्या बैठकीत बोलताना दौलत बचाव कृती समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष मळविकर. शेजारी अथर्वचे मानसिंग खोराटे, प्रभाकर खांडेकर, गोपाळराव पाटील, अशोक जाधव, संजय पाटील व इतर.
चंदगड / प्रतिनिधी
दौलत कारखाना चालवायला जी पार्टी येईल त्याचे स्वागत करण्याचे कामगार व शेतकरी यांनी ठरवले होते. जिल्हा बँकेने अथर्व कंपनीला कारखाना कराराने चालवायला दिला. हा निर्णय समस्त चंदगड वासियांनी स्वीकारला आहे. त्यामुळे तालुका संघाचे चेअरमन राजेश पाटील यांनी हायकोर्टमध्ये दाखल केलेली याचिका माघार घ्यावी असे आवाहन दौलत बचाव कृती समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष मळविकर यांनी केले आहे. हलकर्णी (ता. चंदगड) येथे अथर्वचे मानसिंग खोराटे यांनी बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. अध्यक्षस्थानी गोपाळराव पाटील होते. 
बैठकीवेळी बोलताना अथर्वचे मानसिंग खोराटे, समोर उपस्थित जनसमुदाय.
अथर्व कंपनीचे मानसिंग खोराते म्हणाले, ``दौलतला गतवैभव प्राप्त करून देण्याचे माझे प्रयत्न आहेत. मला दौलत चालू करायचा आहे, त्यामध्ये राजकारण करायचे नाही. कारखाना सुरु करण्यासाठी वीज, पाणी व अन्य गोष्टीची गरज असून त्याची तजबिज करण्याचे नियोजन केले आहे. साखर कारखाना योग्य पध्दतीने चालविण्याठी शेतकरी, उत्पादक व कामगार हे महत्वाचे घटक आहेत. त्यासाठी दौलतच्या सभासद, शेतकरी यांनी दौलत सुरु करण्यासाठी साथ द्यावी, दौलतला गतवैभव प्राप्त करुन देईन असे आवाहन केले.`` दौलतचे संचालक गोपाळराव पाटील म्हणाले ``दौलत चांगल्या परिस्थितीमध्ये असताना काही लोकांना ते सहन न झाल्याने जाणीवपूर्वक काहींनी पाय खेचण्याचा प्रयत्न केला. दौलतच्या आजच्या परिस्थितीला तालुक्यातील नेतेच जबाबदार आहेत. भविष्यात मात्र जे आडवे येतील, त्यांना सरळ केल्याशिवाय राहणार नाही.`` प्रभाकर खांडेकर म्हणाले, ``दौलत राजकारण विरहित चालला पाहिजे. त्यासाठी सर्वानी सहकार्य करावे. राजकीय जोडे गेटच्या बाहेर काढून यावेत असे आवाहनही करण्यात आले.``  यावेळी चेअरमन अशोक जाधव, व्हा. चेअरमन संजय पाटील, महादेव कांबळे यांची भाषणे झाली. कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पवार यांनी प्रास्ताविक केले. आभार अनिल होडगे यांनी मानले. या वेळी कामगार, शेतकरी, दौलत संचालक, सभासद व तालुक्यातील लोक उपस्थित होते. 

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दौलत साखर कारखाना परिसरातील गणेश मंदिरात अथर्व कंपनीचे मानसिंग खोराटे यांचे आई-वडील यांच्या हस्ते अभिषेक व पुजा करुन कारखान्याच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली. यावेळी उत्पादक शेतकरी, कामगार यांच्यासह हितचिंतक हजर होते. 

No comments:

Post a Comment