चिंचणे मधील वाळू उत्खनन तात्काळ थांबविण्याची ग्रामस्थांची मागणी, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

16 April 2019

चिंचणे मधील वाळू उत्खनन तात्काळ थांबविण्याची ग्रामस्थांची मागणी, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन


अडकूर / प्रतिनिधी
चिंचणे (ता. चंदगड) येथील नविन गावठाण गट न. 33 मधील धोंडिबा शंकर पाटील यांच्या मालकीच्या जागेमध्ये चालू असलेल्या वाळू उत्खननामूळे नवीन गावठाणला प्रचंड धोका निर्माण झाला आहे. त्यामूळे येथील वाळू उत्खनन त्वरीत थांबवावे अशी मागणी चिंचणे येथील ग्रामस्थांनी गडहिंग्लज प्रांताधिकारी व चंदगडचे तहसिलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ``प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गट नं. 101 मध्ये नवीन गावठाण वाढीचे 60 भुखंड पडले असून त्याची मोजणी 22 तारखेला होणार आहे. या गट नंबरला लागूनच गट नं. 33 मध्ये धोंडिबा पाटील यांच्या मालकी क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाळू उत्खनन चालू आहे. लागूनच गावठाण हदद् तीही उंच डोंगर उतारावर आणि त्याच्या पायथ्यालाच होणारे वाळू उत्खनन यामूळे गावठाण धोक्यात आले आहे. या परिसरात पडणाऱ्या पावसामुळे हे गावठाणच या वाळूसाठी खोदलेल्या खड्यामध्ये येऊन पुन्हा एकदा माळीन सारखी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच गावालगतच हा प्रचंड खड्डा तयार होत असल्याने या खड्यात जनावारे, माणसे, लहान मुले पडण्याचा धोका आहे. शासनाने या सर्वाचा विचार करून येथील वाळू उत्खनन तात्काळ थांबविण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनावर गोपाळ पाटील, नारायण गुरव, अरूण कांबळे, बसवाणी पाटील, आनंदा पाटील यांच्यासह चाळीसहून अधिक ग्रामस्थांच्या सहया आहेत.


No comments:

Post a Comment