हेरले फाट्यावर निवारा शेड उभारण्याची प्रवाशांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2019

हेरले फाट्यावर निवारा शेड उभारण्याची प्रवाशांची मागणी

हातकणंगले तालुक्यातील हेरले गावच्या फाट्यावर एसटी व बस थांबा प्रवाशी निवारा शेड विना ( छाया -सुधाकर निर्मळे)
हेरले / प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील हेरले गावाच्या फाटयावर प्रवाशी निवारा शेड नसल्याने एसटी व बसची तासंनतास  प्रवाश्यांना उभे राहून वाट पाहावी लागत असल्याने उन्हाळ्याच्या  उष्मामुळे ग्रामस्थांचे बेहाल होत आहे. राज्य परिवहन विभाग व महानगर पालिका परिवहन विभागाने याची दखल घेऊन त्वरीत प्रवाशी निवारा शेड उभारावे अशी मागणी गावच्या व परिसरातील प्रवाशी वर्गातून होत आहे.
हेरले गाव परिसरातील मोठे गांव आहे. गावातील महाविद्यालयीन विदयार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यापारीवर्ग, कामगार, मजूरवर्ग,वयोवृध, महिलावर्ग शैक्षणिक, नोकरी, दवाखाना, बाजारपेठेतील दैनदिंन विविध गरजांच्या वस्तूंची खरेदी आदी कामानिमित्त कोल्हापूर, इचलकरंजी, हातकणंगले, शिरोली औदयोगिक वसाहत, जयसिंगपूर, सांगली व परिसरातील गावांमध्ये त्यांची दैनदिन एसटी व सिटी बस या सार्वजनिक वाहनांतून प्रवास होत असतो.मात्र गावच्या फाटयावर एसटी स्टॉप व बस स्टॉप फलका पुरताच त्यांचे अस्तित्व आहे.
राज्य परिवहन विभाग व महानगरपालिका परिवहन विभागाकडून ज्यां गावांना एसटी स्टॉप व बस स्टॉप दिलेला असतो. त्या ठिकाणी प्रवाशी निवारा शेड उभारण्याचे त्यांचे कर्तव्य आहे. मात्र हेरले गावासाठी फक्त छोटे फलकच दिसतात. कित्येक वर्षाची ग्रामस्थांची  मागणी असूनही त्यांची उदासिनता असून आजतागायत प्रवाशी निवारा शेड उभारलेले नाही. हातकणंगले पासून शिरोली पर्यंत कोल्हापूर -सांगली मार्गावरील हेरले गाव वगळता सर्व गावांच्या फाटयावरती प्रवाशी निवारा शेड उभारलेली दिसून येतात. मग हेरले गाव त्यांच्या दृष्टीस पडत नाही का ? हा संशोधनाचा विषय ठरत आहे. या गावातून सार्वजनिक वाहनातून प्रवाश्यांची संख्या असंख्य असल्याने या मार्गावरील सर्व बसेस तुडुंब भरलेल्या असतात. सर्व बसच्या फेऱ्या फायदेशीर असतांना प्रवाश्यांच्या सोयीचे व हिताचे त्यांनी आजतागायत विचार केलेला नाही. 
गावातील युवक, युवती, वयोवृद्थ, तरुण, महिलांना गावच्या फाटयावर कडक उन्हात तासंनतास या सार्वजनिक वाहनांची वाट पाहत उभे राहावे लागते. पावसाळ्यात ही उभ्या पावसात उभे राहून गाडीची प्रतिक्षा करावी लागते त्यामुळे त्यांचे बेहाल होत आहेत. या समस्याची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन विभाग, महानगर पालिका परिवहन विभागाने घेऊन प्रवाश्यांचे होणारे  बेहाल थांबविण्यासाठी  तात्काळ निवारा शेड उभारावे.अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.  

No comments:

Post a Comment