चंदगड
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्विकृती परिषदेचे (नॅक) सदस्य मंगळवारी (ता. 14) व बुधवारी (ता. 15) या कालावधीत पुनर्मुल्यांकनासाठी भेट देत असल्याची माहीती प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी दिली.
यापुर्वी महाविद्यालयाचे दोन वेळा मूल्यांकन झालेले असून दोन्ही वेळेस `ब` मूल्यांकन प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागातील गुणवत्तापुर्ण महाविद्यालय म्हणून नावलौकिक प्राप्त केलेले हे महाविद्यालय नॅक पुनर्मुल्यांकनासाठी तिसऱ्यांदा सामोरे जात आहे. गेल्या 5 वर्षातील महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व शिक्षणपुरक कामगिरीचा यावेळी आढावा घेतला जाणार आहे. अभ्यासक्रम, शिक्षणपुरक उपक्रम, विस्तारकार्य, संशोधन व नवोपक्रम, शैक्षणिक सुविधा, व्यवस्थापन व प्रशासन, विद्यार्थी कल्याण या विविध आघाड्यावर महाविद्यालयाने केलेल्या कार्याचे मूल्यमापन होणार आहे. राष्ट्रीय पातळीवर थाळीफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा कीर्तीकुमार बेनके याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. जिल्हास्तरावरील व मध्यवर्ती युवा महोत्सवात महाविद्यालयाने वक्तृत्व, रांगोळी, प्रश्नमंजुषा, वाद्यवृंद इ. क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या ग्रामीण विभागातील गुणवत्ता शिष्यवृत्तीत महाविद्यालयास प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. यावर्षी 10 विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळवली असून महाविद्यालयाने विद्यार्थी व समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले आहेत. महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी पुनर्मुल्यांकनासाठी युद्धपातळीवर कार्यरत असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सांघिक भावनेने व सौहार्दपुर्ण वातावरणात चाललेल्या सातत्यपुर्ण प्रयत्नामुळे महाविद्यालयास निश्चितच चांगले मानांकन मिळेल अशी अशा सर्वांना आहे.
No comments:
Post a Comment