कलिवडे -किटवडेच्या शेतकऱ्यांची वन अधिकाऱ्यांनी घेतली भेट, हत्ती व गव्याच्या नुकसानीवर चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

24 May 2019

कलिवडे -किटवडेच्या शेतकऱ्यांची वन अधिकाऱ्यांनी घेतली भेट, हत्ती व गव्याच्या नुकसानीवर चर्चा

कलिवडे- किटवडे येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा वन  अधिकारी हनमंत धुमाळ, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, पाटणेचे वन अधिकारी एम एन परब.
कार्वे  / प्रतिनिधी
कलानंदीगडाच्या पायथ्याशी असलेल्या आंबेवाडी धरणाच्या बाजू च्या ऊस पिकांचे हत्तीकडून अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी थेट कोल्हापूरला धडक दिली होती. खासदार संभाजीराजे यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर खासदारांनी जिल्हा वन अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा वन अधिकारी हनुमंत धुमाळ यांनी कलिवडे -किटवडे  येथील शेतकऱ्यांची चंदगड तालुक्यात येऊन प्रत्यक्ष भेट घेतली. वस्तुस्थिती समजावून घेऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
शेतकऱ्यांनी डोंगराच्या पायथ्याशी हत्ती गवत, केळी, फणस, मेसकाठी यासारख्या वैरणी व झाडे लावावेत अशी मागणी केली. या वनस्पतींमुळे हाती डोंगरातच थांबेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर भरपाईच्या मागणी साठी लागणाऱ्या कागदपत्राची संख्या कमी व्हावी, साधनसामुग्रीच्या  नुकसानाची भरपाई मिळावी, शासनाने पिकांचा विमा उतरवावा, वनक्षेत्राच्या बाजूने सौर उर्जेचे कुंपण करावे, जंगलाच्या बाजूने तीन वर्षापूर्वी मारलेली चर बुजली असल्याने ती नवीन मारावी व डोंगरी भागातील सर्वच कुटुंबांना त्यामध्ये वर्गवारी न करता रेशन धान्य द्यावे अशा मागण्या केल्या.
कलिवडे येथील नागोजी देसाई यांच्या शेतातील नुकसानीत झालेले उसाचे पीक.
या परिसरातून हत्तीला तातडीने बाहेर कसे काढता येईल व नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या हातात तात्काळ कशी देता येईल याचा तातडीने निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांनी व्यक्त केले. जिल्हा वन अधिकारी हनमंत धुमाळ यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हती पकडणारी यंत्रणा कर्नाटकातील आहे. कर्नाटकात साडेसहा हजार हत्ती आहेत. आपल्याकडे आठ हत्ती आहेत. त्यामुळे कर्नाटकातील हत्ती पकडणारी टीम येऊ शकत नाही. महाराष्ट्रात अशी टीम तयार नाही असे सांगितले. मधमाशांच्या पोळ्याला हत्ती घाबरतात. मधमाशांच्या जवळ हाती फिरकत नाहीत. त्यामुळे सध्या 50 मधपेट्या ठेवण्यात येतील व गरज पडल्यास पुन्हा देऊ असे सांगितले. नुकसान  भरपाईसाठी लागणाऱ्या कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्या दाखल्यासह अन्य अनावश्यक कागदपत्रे कमी करण्यात येतील असे सांगितले. गॅस सिलिंडर अनुदान उपलब्ध झाल्यानंतर तात्काळ जमा करण्यात येईल असे सांगितले. यावेळी माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, मारुती कुट्रे, पाटणे वन परिक्षेत्र अधिकारी एम एन परब, निवृत्ती पाटील, अशोक कदम, रुकमाना देसाई, नागोजी देसाई, सर्व वनपाल यांच्यासह कलिवडे किटवडे चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





No comments:

Post a Comment