ऊस उत्पादन वाढीसाठी मेहनतीच्या जोडीला नवीन तंत्रज्ञान वापरा -भरत कुंडल - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2019

ऊस उत्पादन वाढीसाठी मेहनतीच्या जोडीला नवीन तंत्रज्ञान वापरा -भरत कुंडल

ओलम शुगर मार्फत शेतकरी मेळावा व शेती तंत्रज्ञान प्रदर्शन उत्साहात
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम हेमरस साखर कारखाना मार्फत आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना भरत कुंडल सोबत संजय सचेती, मल्लिकार्जुन मुगेरी, वसंतदादा ऊस संशोधन केंद्र पुणे चे तज्ञ.  
कालकुंद्री / प्रतिनिधी
परिसरातील शेतकऱ्यांनी ओलम - हेमरस वर दाखवलेला विश्वास कायम ठेवण्यासाठी आमचे कर्तव्य म्हणून नवनवीन तंत्रज्ञान प्रशिक्षण गावोगावी व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत दिले जात आहे. ते सहयोग पूर्वक घेतल्यास शेतीचे उत्पन्न वाढेल असा विश्वास राजगोळी तालुका चंदगड येथील ओलम कारखान्याचे युनिट हेड भरत कुंडल यांनी  व्यक्त केला. ते कारखाना मार्फत आयोजित शेतकरी मेळावा व शेती तंत्रज्ञान तसेच अवजार प्रदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते . उद्घाटन ओलम कंपनीचे राष्ट्रीय प्रमुख संजय संचेती यांच्या हस्ते झाले .
स्वागत मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील व एच आर हेड जसबिर राखा यांनी केले .यावेळी पुढे बोलतांना कुंडल म्हणाले काही असंतुष्ट लोक हेमरस कारखाना काटा मारतो असा कांगावा करतात त्यांनी रात्री अपरात्री केव्हाही काट्याची तपासणी करावी किंवा दुसर्‍या कोणत्याही काट्यावर वजन करून आणावे एक किलोचा फरक निघणार नाही. यापूर्वी जवळच्या शेतकऱ्यांनी उसाची सहा वाहने गुप्त पणे दुसरीकडे वजन करून नंतर आमच्या कारखान्याकडे आणली त्यांना एका किलोचा फरक आढळला नाही .ही वस्तुस्थिती आहे. या प्रामाणिकपणामुळेच शेतकऱ्यांचा आमच्यावर विश्वास आहे. नियमित ऊस पुरवठा करणारा शेतकरी आर्थिक अडचणीत असेल तर  कारखान्याने त्याला आगाऊ आर्थिक मदत केली आहे .प्रशासन व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पारिवारिक नाते आहे ते अधिक दृढ व्हावे अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली. 
ओलम शुगर मार्फत शेतकरी मेळावा व शेती तंत्रज्ञान प्रदर्शनाला उपस्थित शेतकरी.
यावेळी कंपनीचे मुख्य संजय संचेती म्हणाले ऊस लावण्यासाठी जमीन वाढणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवले पाहिजे .चंदगडमध्ये हेक्टरी पंच्याण्णव टन ऊस पिकवणारे शेतकरी आहेत सर्वांनी अशी मेहनत घेतली तर ओलम चे गाळप साडेसहा लाखावरुन  दहा लाख होईल आणि शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळतील . यासाठी कंपनीच्या संपर्कात राहून नवीन बी-बियाणे ,औषधे ,खते व तंत्रज्ञानाचा लाभ घ्या. आता पारंपरिक शेती परवडणार नाही असे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी ठिबक सिंचन प्रणाली  बद्दल अरुण देशमुख यांचे , उसावरील हुमणी , तांबेरा आदी कीड रोगांबद्दल शास्त्रज्ञ एस बी माने पाटील यांचे , अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयी शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे यांचे ,तर ऊस पीक यांत्रिकीकरण विषयावर डॉक्टर एम पी शर्मा यांची व्याख्याने झाली. यावेळी मल्लिकार्जुन मुगेरी,सौ  श्रीमंता सलाम ,महादेव निवगिरे, विष्णू गावडे ,प्रशांत पाटील आदी शेतकऱ्यांनी भाषणे केली.कार्यक्रमास  मोहम्मद दिलशाद , शिवाजी सडाके ,मावळेश्वर कुंभार ,पं स सदस्या नंदिनी पाटील ,नायब तहसीलदार नांगरे ,दत्तू कडोलकर सचिन रावल ,कृषी अधिकारी किरण पाटील व नामदेव पाटील आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते. यावेळी विविध ट्रॅक्टर, शेती अवजारे , सेंद्रिय खते ,जैविक खते व औषधे ,बियाणे यांच्या कंपन्यांनी मांडलेल्या स्टॉल ना मोठा प्रतिसाद लाभला. शेवटी अनिल पाटील यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment