![]() |
अलबादेवी येथील विज पुरवठा सुरळीत करण्यासाठीचे निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना देताना श्रीकांत नेवगे |
चंदगड / प्रतिनिधी
अलबादेवी (ता. चंदगड) येथे विजेपुरवठा खंडीत झाल्याने पाणीपुरवठ्यासह अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत मुंबईस्थित चंदगड मंडळाचे अध्यक्ष विलास कोंडुसकर, श्रीकांत नेवगे व ग्रामस्थांनी विज वितरणचे उप कार्यकारी अभियंता श्री. लोधी, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. आळंदे, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता बाळासाहेब शेंडे यांची भेट घेतली. यावेळी अलबादेवी व परिसरातील गावातील विविध समस्या मांडल्या.
गेल्या १० दिवसापासून अलबादेवी, शिरोली, सत्तेवाडी, पोवाचीवाडी या गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी अलबादेवी गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरायची वेळ आली आहे. या गोष्टीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. पाण्यासाठी जीव धोक्यात घालून लोक डोंगर, कपाऱ्यातुन लांबून पिण्यासाठी पाणी आणत आहेत. गावातील मिळेल त्या विहिरीचा आधार घेत असून यासंदर्भात विलास कोंडुस्कर व श्रीकांत नेवगे यांनी संबंधित अधिकारी यांची भेट घेऊन हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अन्यथा विजवीतरण व पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
यावेळी सभापती बबनराव देसाई यांनी ``प्रशासन यांची बैठक बोलवून पाणी प्रश्नांवर कोणतीही तडजोड करू नका. तातडीने अलबादेवी गावचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याबाबतच्या सुचना दिल्या. मुंबई मंडळाचे सचिव नामदेव घोळसे यांनी अलबादेवी पाणी टंचाई संदर्भात सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. आळंदे यांच्याशी चर्चा केली. या गोष्टीची तात्काळ दखल घेत पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी अलबादेवी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर पाणीपट्टी व घरपट्टी वसूल करणे इतकेच ग्रामपंचायतची काम आहे का? याव्यतिरिक्त लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे असली कामे ग्रामसेवक व संबंधित लोकांची नाहीत का? असा प्रश्न पंचायत समिती सभापतीच्या उपस्थितीत नेवगे यांनी व्यक्त करून या संदर्भात मुंबई मंडळी याच्या उपस्थितीत ग्रामसभा घ्या असे सूचित केले. सभापती यांनी महा वितरणचे उपअभियंता श्री. लोधी यांच्याशी चर्चा केली असता सदर विषय तात्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी चर्चेत उपसरपंच राजाराम पाडले, धोंडिबा घोळसे, यशवंत घोळसे, परशराम चौकळकर, विष्णू पाटील, पांडुरंग पवार यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment