चंदगड तालुक्यात विविध उपक्रमांनी राजर्षी शाहु जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2019

चंदगड तालुक्यात विविध उपक्रमांनी राजर्षी शाहु जयंती साजरी

चंदगड साहित्य रत्न ग्रुपच्या वतीने मौजे शिरगाव येथील भंगार गोळा करणाऱ्या समाजातील मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी विविध उपक्रमांनी राजर्षी शाहु जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त अडकूर, नांदवडे, चंदगड, कोवाड, कालकुंद्री, हलकर्णी, माणगाव यासह अन्य शाळांमध्ये राजर्षी शाहुच्या कार्याची महती सांगण्यात आली. 
चंदगडच्या साहित्य रत्न समूहाने सामाजिक बांधिलकी जोपासत अनोख्या पध्दतीने शाहू जयंती साजरी केली. भंगाराच्या पसाऱ्यात त्यांचा जन्म झाला आणि यातच त्यांच्या शिक्षणाच्या वाटा निसरट्या झाल्या. याच निसरट्या वाटेवर त्या मुलांना आधार दिला तो चंदगडच्या साहित्य रत्न ग्रुपने. भंगार गोळा करणाऱ्या लोकाकडे समाजवेगळ्या दृष्टीकोनातून पाहतो. या निमित्ताने भंगारातच आपल्या जीवनाचा अर्थ शोधणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य देऊन चंदगडच्या साहित्य रत्न ग्रुपने आपल्यातील कवी मनाची संवेदनशीलता जपली आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून मौजे शिरगाव येथील भंगार गोळा करणाऱ्या समाजातील मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कु. संजना लाडलक्ष्मीकार, कु. साधना लाडलक्ष्मीकार, अंजली लाडलक्ष्मीकार, अक्षता लाडलक्ष्मीकार, शेखर लाडलक्ष्मीकार, अमर लाडलक्ष्मीकार या विद्यार्थांना छत्री, दप्तर, वह्या, कंपास पेटी, पेन, रंगपेटी इ.साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी साहित्य रत्नचे बी. एम. पाटील म्हणाले 'शाहू महाराजांनी भटक्या विमुक्त जमातींच्या कल्याणासाठी आंतरिक मानवता जपत कार्य केले. माणूसपण नाकारलेल्या आणि भटकंतीचे जीवन जगणाऱ्या या जमातींना माणूसपण दिलं. राजर्षी शाहूंच्या या विचारांचे पाईक होण्याचा आमचा साहित्य रत्न समूह प्रयत्नशील असल्याचे सांगितले.` यावेळी साहित्य रत्नचे राजेंद्र शिवणगेकर, संजय साबळे, जयवंत जाधव,प्रमोद चांदेकर, हणमंत पाटील, कमलेश जाधव उपस्थित होते. 
 केंद्र शाळा कोवाड येथे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भाषण करताना विद्यार्थिनी. बाजुला शिक्षक.
                                 कोवाड केंद्रांतर्गत सर्व शाळांत शाहू जयंती उत्साहात 
कालकुंद्री / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) केंद्रांतर्गत सर्व शाळांत लोकराजा राजर्षी शाहू यांची जयंती विविध उपक्रमानी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. केंद्र शाळा कोवाड येथे मुख्याध्यापक श्रीकांत वै. पाटील यांच्या हस्ते शाहूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी बाल सभा मंत्री प्रतीक्षा चांभार ही होती. यावेळी घेण्यात आलेल्या बाल सभेत पियुशा यादव ,प्रांजल पाटील ,वेदांती सूर्यवंशी ,ऋतुजा भोगण,प्रतीक्षा चांभार ,श्रेयश चौगुले ,अथर्व भोगण, हर्षदा होण्याळकर ,अथर्वी जाधव, नंदिनी कुंभार या  विद्यार्थ्यांनी लोकराजा शाहू यांच्या बद्दल भाषणे केली. मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी राजर्षी शाहूंचे क्रीडा ,शैक्षणिक ,शेती ,जलसिंचन तसेच अस्पृश्यता निवारण बाबत केलेले उत्तुंग कार्य याबद्दलची सविस्तर माहिती  सांगितली. यावेळी गणपत लोहार, श्रीकांत आप्पाजी पाटील लता सुरंगे यांची भाषणे झाली. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार कविता पाटील यांनी मानले. कोवाड शिवाय केंद्रातील दुंडगे, चिंचणे, कामेवाडी ,तेऊरवाडी, किणी, निटुर, मलतवाडी, घुलेवाडी आदि प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांत लोकराजे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

अडकूर (ता. चंदगड) येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयी बोलताना प्राचार्य डी. जी. कांबळे, समोर उपस्थित विद्यार्थी.
                             अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूलमध्ये शाहू जयंती उत्साहात साजरी 
तेऊरवाडी / प्रतिनिधी
अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज यांची 145 वी जयंती मोठ्या  उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. जी. कांबळे होते. प्रारंभी शाहू प्रतिमेचे पूजन प्राचार्य कांबळे यांच्या हस्ते झाले. यानंतर भाषण व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. भाषण स्पर्धेमध्ये अनुक्रमे तनुजा पाटील, चेतन इंगवले, अथर्व कांबळे, लतिका इंगवले, रुकसाना शेख, मारूती पाटील, अनिकेत वाईंगडे, मंजुषा कांबळे, स्वराजली घोडके यांनी क्रमांक मिळवले. यावेळी गावातून समता रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाला पर्यवेक्षक एस. जी. पाटील, पी. के. पाटील, आर. पी. पाटील, एस. डी. पाटील आदि उपस्थित होते.


No comments:

Post a Comment