चंदगडला दिवसभर पडलेल्या पावसामुळे शेतीकामांना वेग, पार्लेत घराचे छप्पर उडून दोन लाखाचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

13 June 2019

चंदगडला दिवसभर पडलेल्या पावसामुळे शेतीकामांना वेग, पार्लेत घराचे छप्पर उडून दोन लाखाचे नुकसान

कोवाड (ता. चंदगड) येथे मुसळधार पावसामुळे आठवडा बाजारात शुकशुकाट दिसत होता. 
चंदगड / प्रतिनिधी
शहर परिसरात आज दिवसभर पावसाची संततधार सुरु आहे. सकाळपासून रिघ धरलेला पाऊस सायंकाळापर्यंत सुरुच होता. त्यामुळे अनेकांनी वर्षभर ठेवलेल्या छत्र्या अखेर बाहेर काढल्या. चंदगड व कोवाड येथे आज आठवडा बाजार असल्याने दिवसभर पडलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची गैरसोय झाली. व्यापाऱ्यांनी काही अंशी भिजतच दिवसभर भाजीपाल्याची विक्री केली. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात सरासरी 24.33 तर आतापर्यंत 40.83 मिलीमीटर इतका पाऊस झाला. तर सर्कलनिहाय चंदगड (28), नागणवाडी (29), माणगाव (6), कोवाड (12), तुर्केवाडी (17), हेरे (54) असा पाऊस झाला. काल व आज झालेल्या पावसामुळे मौजे पार्ले (ता. चंदगड) येथील पुंडलिक डामा कांबळे यांच्या घराचे छप्पर उडून घरात पाणी शिरल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. चंदगड तालुक्यात सर्वत्र पाऊस झाल्याने कर्यात भागात पेरणीची एकच धांदल उडाली आहे. त्यामुळे संपुर्ण शिवार लोकांनी फुलून गेले होते. शाळा सुरु होण्याला अजूनही अवकाश असल्याने लहान मुलेदेखील घरच्यांना मदत करण्यासाठी व कुतुहलाने दिवसभर शेतात हुंदडताना दिसत होती. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. सर्वत्र पेरणीसाठी हंगाम साधला जात असल्याने मजुरांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे. परिणामी मजुरांचा भाव वधारला असल्याचे चित्र आहे.
 तेऊरवाडी ता . चंदगड येथे  धूळवाफ पेरणी करताना शेतकरी वर्ग.
कोवाड परिसरात पेरणीची धांदल, शिवारे फुलली माणसांनी, अधुन-मधून पावसाच्या जोरदार सरी
तेऊरवाडी / प्रतिनिधी
कोवाड परिसरात धुळवाफ पेरणीची मोठी धांदल उडाली असून शिवार माणसानी फुलले आहेत. धुळवाफ पेरणी असली तरी या परिसरात पावसाला सुरवात झाली असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कोवाड परिसरातील दुंडगे, कुदनूर, राजगोळी, तेऊरवाडी, होसूर, किणी, नागरदळे, तेऊरवाडी आदि गावामध्ये 
धुळवाफ पेरणी केली जाते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात किंवा जुनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत धूळवा फ भातपेरणी पूर्ण केली जाते. या भागात माती काळी असल्याने रोप करण्यामध्ये अडचणी येतात . चिखल खूप होत असल्याने या चिखलामध्ये बैल अगर ट्रॅक्टर अडकून राहते . म्हणून धूळवाफ केली जाते . पण चालू वर्षी मे महिन्यात वळीव पाऊस च  पडला नाही . त्यामुळे  वेळेत  पेरणीसाठी शेती तयार झाली नाही . आता पाऊस तर चालू झाला आहे पण शेत तयार नाही अशा अवस्थेत सर्वच शेतकरी शेत तयार करून पेरणीच्या कामात गुंतला आहे .सर्वत्र एकच धांदल उडाली असून मजूरांचा प्रयंड तुटवडा निर्माण झाला आहे . प्रत्येक  गावामध्ये मोजक्याच बैलजोडया असल्याने बैलजोडीला शेतीकामासाठी प्रचंड मागणी वाढली आहे . ट्रॅक्टर तासाला आठशे हे तर बैलजोडीला दिवसाला हजार रुपये घेतले जात आहेत .पेरणीसाठी कोवाड बाजारपेठेमध्ये विविध कंपन्यांची भात बियाणे उपलब्ध आहेत तर गावागावात असणाऱ्या विकास सेवा सोसायट्यामध्ये चंदगड तालूका संघाने खत उपलब्ध करून दिले आहे .बियाणांच्या व खताच्या  खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे .एकंदरीत कोवाड परिसरातील शेतकरी वर्ग पेरणीच्या कामामध्ये गुंतला आहे . अधून मधून पाऊसही पडत असल्याने ज्या शेतकऱ्यांची भात पेरणी प़र्ण झाली आहे ते शेतकरी आनंदात तर ज्यांची पेरणी अपूर्ण आहेत ते शेतकरी मात्र चितेत आहेत .

No comments:

Post a Comment