किल्ले पारगड एसटी आठ दिवसापासून बंद, विजही दहा दिवसापासून गायब, ग्रामस्थांचे होतायेत हाल - चंदगड लाईव्ह न्युज

16 June 2019

किल्ले पारगड एसटी आठ दिवसापासून बंद, विजही दहा दिवसापासून गायब, ग्रामस्थांचे होतायेत हाल

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले पारगड
श्रीकांत पाटील / कालकुंद्री
चंदगड ते पारगड धावणारी चंदगड आगाराची एसटी बस गेल्या आठ दिवसापासून बंद झाली असल्याने किल्ले पारगड पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पर्यटकांचे हाल होत आहेत. त्यातच दहा दिवसांपासून वीजपुरवठाही खंडित झाल्याने नागरिकांसमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे चंदगड आगारप्रमुखांनी या प्रश्नाकडे तर वीज वितरणने वीज पुरवठा सुरळीत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 
आठ दिवसा पासून अचानक रस्त्याचे कारण पुढे करत आगाराने पारगड पायथ्यापर्यंत जाणारी बस बंद केली. त्यामुळे ही बस वाघोत्रे गावापर्यंत सोडली आहे. मात्र खाजगी वाहने, ट्रक इत्यादी गाड्या किल्ल्यापर्यंत जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. बस बंदमुळे वृद्ध, आजारी ग्रामस्थ व पर्यटकांचे हाल होत आहेत. याची तात्काळ दखल घेऊन संबंधित बांधकाम विभागाने रस्त्याच्या अडचणींचा निपटारा करावा व आगार व्यवस्थापकांना कळवून तात्काळ बस सेवा पूर्ववत करावी अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी केली आहे.
पारगडवर सहा जून रोजी शिवप्रेमीनी मोठ्या उत्साहात राज्याभिषेक दिन साजरा केला होता. त्या पूर्वसंध्येला पाच रोजी आलेल्या वादळी पावसामुळे खंडित झालेली वीज दहा दिवस झाले तरी अद्याप सुरू नाही. वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी नेहमीच या भागावर अन्याय करतात असा येथील स्थानिकांचे म्हणने आहे. अनेकदा दहा ते पंधरा दिवस वीज खंडित होते. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लोकप्रतिनिधींसह विविध पक्षांचे नेते, प्रमुख गडावर वेळोवेळी होणाऱ्या कार्यक्रमात आश्वासने देऊन जातात. पण प्रत्यक्ष कामाची काहीच हालचाल होताना दिसत नाही, हा ग्रामस्थांचा अनुभव आहे.  पाण्याअभावी दोन महिने गडकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. तथापि शेवटपर्यंत उपाययोजना झाली नाही.
सर्वच मूलभूत सुविधांपासून पारगड ग्रामस्थांना वंचित ठेवायचे असेल तर गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनुसार किल्ल्यासह ग्रामस्थांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घालावे अशी मागणीही रघुवीर शेलार यांनी  केली आहे. एकंदरीत शिवरायांचा आदेश शिरसावंद्य मानून गेली साडेतीनशे वर्षे गड सांभाळणाऱ्या गडकऱ्यांना वीज, पाणी, वाहतूक, आरोग्य या  मूलभूत सुविधा तरी वेळेत उपलब्ध करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जागरूक राहण्याची गरज आहे.

श्रीकांत पाटील, कालकुंद्री

No comments:

Post a Comment