![]() |
चंदगड येथे पाणीटंचाई बैठकीला उपस्थित आमदार संध्यादेवी कुपेकर, तहसिलदार विनोद रणावरे व इतर. |
चंदगड तालुक्यातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी येथील तहसिल कार्यालयात तहसिलदार विनोद रणावरे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या उपस्थितीत तालुक्यातील पाणीटंचाई आढावा बैठक बोलावण्यात आली होती.
यावेळी चंदगड आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनी तालुक्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतला. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता ए. एस. सावळगी तालुक्यातील पाणी पुरवठ्याबाबतचा आढावा सादर केला. तालुक्यात चार विंधन विहीरी मारल्या असून यापैकी खालसा म्हांळुगे व मासुरेवाडी या दोन विहीरीना भरपूर पाणी लागले तर शिनोळी खुर्द व जक्कनहट्टी येथील विहिरींना पाणी लागले नाही. काजिर्णेपैकी धनगरवाड्यावर बोअरवेलची मशीन जाण्यासाठी वाट नसल्याने विंधन विहीर मारता आली नाही. तुडिये, सुरुते, मजरे जट्टेवाडी, बोजुर्डी, मोरेवाडी येथे गावासाठी खासगी विहीरी व बोर अधिग्रहण करुन पाणी पुरवठा सुरु असल्याचे सांगितले.
तालुक्यात यावर्षी काजूचे उत्पादन कमी प्रमाणात झाले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी विभागाने नुकसनग्रस्त शेतकऱ्यांच्या काजू उत्पादनाची माहीती घेवून योग्य अहवाल शासनाकडे सादर करावा, म्हणजे त्यांना नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करता येईल. सुळये व उमगाव येथे टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी माजी जि. प. सदस्य बाबुराव हळदणकर यांनी केली. अडकूर पाणी योजना नियोजनाअभावी बंद अवस्थेत आहे. त्या संबंधित योग्य माहीती घेवून ग्रामस्थांना द्यावी अशी मागणी बंडु रावराणे यांनी केली. सातशे ते आठशे लोकसंख्या असलेल्या गावांना स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर करावी अशी मागणी जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण यांनी केली. माणगाव येथील पुलाचे काम भूमिअभिलेख खात्याच्या गलथान कारभारामुळे रखडल्याचे विलास पाटील यांनी सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी आर. बी. जोशी, पं. स. सदस्य नंदिनी पाटील, अरुण पिळणकर, नामदेव पाटील, सचिन पिळणकर, भावकु गुरव, योगेश कुडतरकर उपस्थित होते.
संपुर्ण उन्हाळ्यात पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईबाबत उपापयोजना करण्यासाठी अधिकारी व पदाधिकारी यांनी बैठक घेणे गरजेचे होते. मात्र मान्सुनच्या पूर्वसंध्येला पाणीटंचाईची बैठक घेणे म्हणजे अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे वरातीमागून घोडे असल्याची चर्चा लोकांतून होत आहे.
चंदगडला क्रिडा संकुल मंजूर होवून पाच ते सहा वर्षे झाली. क्रिडा संकुल होणाऱ्या ठिकाणी असलेली ग्रामपंचायतीला उत्पन्न देणारी काजूची झाडे तोडून जागा क्रिडा संकुलसाठी दिली. मात्र हे क्रिडा संकुल अद्यापही पुर्ण झाले नसल्याने ग्रामपंचायतीचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आम्ही जीवंत आहे, तोपर्यंत आमची नातवंडेतरी या क्रिडागणांत खेळू देत अशी मागणी माजी जि. प. सदस्य बाबुराव हळदणकर यांनी संबंधिक ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली.
No comments:
Post a Comment