हुल्लडबाज पर्यटकांच्या मुळे पारगडचे पावित्र्य धोक्यात, प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2019

हुल्लडबाज पर्यटकांच्या मुळे पारगडचे पावित्र्य धोक्यात, प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक

शिवप्रेमी पर्यटकांचे वर्षानुवर्षे आकर्षण ठरलेला पारगड किल्ला.
श्रीकांत पाटील / कालकुंद्री  प्रतिनिधी
गेल्या काही दिवसात हुल्लडबाज पर्यटकांमुळे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पारगडचे पावित्र्य धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे .याचा नाहक त्रास तेथील शांतताप्रिय ग्रामस्थांनाही बसत असून याला पोलिस व वन विभागाने आळा घालावा अशी मागणी होत आहे.
गेल्या काही वर्षात ऐतिहासिक पर्यटन स्थळ किल्ले पारगड कडे जाणारा रस्ता चांगला झाल्यामुळे पूर्वी केवळ शिवप्रेमी पर्यटकांचा राबता असणाऱ्या किल्ले पारगड कडे सर्वच प्रकारच्या पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे. यातील बहुतांशी पर्यटक या पवित्र ठिकाणी दारू पिऊन दंगा-मस्ती करताना दिसतात. अशा मंडळींना जाऊन सांगण्याचे धाडस इथले ग्रामस्थ  करू शकत नाहीत त्यामुळे हुल्लडबाजांचे अधिकच फावत आहे. याचा त्रास नागरिकांसह शिवप्रेमी पर्यटकांनाही बसत आहे. याला पोलिस व वन विभाग यांनी समन्वयाने आळा घालण्याची गरज दिसू लागली आहे. चंदगड तालुक्यात स्वप्नवेल,तिलारी तसेच आंबोली ,आंबोली धबधबा, कावळेसाद ,नांगरतास धबधबा अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते तथापि ही पर्यटनस्थळे आणि पारगड हे पर्यटन स्थळ यात फरक आहे हे पर्यटकांनी ओळखले पाहिजेत .गेल्या काही दिवसापासून पावसाळा सुरू झाला असल्यामुळे पावसाळी पर्यटकात हुल्लड बाजांचे  प्रमाण नेहमीपेक्षा अधिक असल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. पावसाळी धुक्याची वातावरण व किल्ल्याला सर्व बाजूनी असलेला ताशीव कडा यामुळे दुर्घटना  घडण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे अशा पर्यटकांना वेळीच आळा घालून किल्ल्याचे पावित्र्य राखावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार व पारगड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
श्रीकांत पाटील, कालकुंद्री



No comments:

Post a Comment