चंदगड / प्रतिनिधी
शहरासह परिसरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस झाला. दुपारनंतर मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरला. तरीही गेले तीन दिवस सुरु असल्याने पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. तालुक्यातील प्रमुख ताम्रपर्णी व घटप्रभा या नद्यां अर्ध्याहून अधिक भरुन वाहत आहेत. पावसाच्या संततधारेमुळे शिवारातही पाणी साचले आहे. भाताचे तरवे आलेल्या काही ठिकाणी रोपलावणीची कामे सुरु आहेत. या संततधार पावसामुळे शेतकरी सुखावला असून शेतीकामांना गती येणार आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात तालुक्यात सरासरी 90.33 तर आतापर्यंत 295.66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चंदगड सर्कलमध्ये 130, नागणवाडी 91, माणगाव 34, कोवाड 42, तुर्केवाडी 94, हेरे 151 मिलीमीटर पाऊस झाला आहे. संततधार सुरु असलेल्या पावसामुळे शिवारात रोपलावणीची धांदल सुरु झाली आहे. त्यामुळे शिवारात माणसांची रेलचेल दिसत होती. दिवसभर राहून-राहून पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. हा पाऊस रोपलवणीला उपयुक्त ठरला आहे. दरम्यान काल सायंकाळी वेगुर्ला-बेळगाव मार्गावर तडशिनहाळ फाट्यावर रस्त्याकडेला असलेले झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने तासभर वाहतुक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने रस्त्यावर पडलेला वृक्ष बाजूला केल्यानंतर वाहतुक सुरळीत झाली.
No comments:
Post a Comment