कोवाडच्या स्मशानभुमीचा प्रश्न तहसिलदारांच्या मध्यस्थीने अखेर मार्गी, ग्रामस्थांची सामंजस्याची भुमिका - चंदगड लाईव्ह न्युज

11 June 2019

कोवाडच्या स्मशानभुमीचा प्रश्न तहसिलदारांच्या मध्यस्थीने अखेर मार्गी, ग्रामस्थांची सामंजस्याची भुमिका

कोवाड (ता. चंदगड) येथे स्मशानभुमीच्या प्रश्नाबाबत जमलेल्या ग्रामस्थासोबत चर्चा करताना तहसिलदार रणावरे व पो. नि. यादव.
कोवाड / प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसापासून कोवाड (ता. चंदगड) येथील प्रलंबित असलेला स्मशान भुमीच्या प्रश्न आज अखेर चंदगडचे तहसिलदार विनोद रणावरे यांच्या मध्यस्थीनंतर मिटवण्यात प्रशासनाला यश आले. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आज संपूर्ण कोवाड बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून ग्रामस्थ एकटवले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक एस. एम. यादव व कोवाड चौकीचे उपनिरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोवाडला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. 
कोवाड ग्रामस्थ व प्रशासनातील अधिकारी स्मशानभुमी जागेच्या ठिकाणी जाताना.
स्मशानभुमीचा रस्ता व स्मशानभुमीची जागा या विषयावरून कोवाड ग्रामस्थांमध्ये एकमत होत नव्हते. ग्रामस्थांनी सरकारकडे निवेदने देवून आंदोलनाचा इशारा दिला होता. आज संपूर्ण कोवाड बाजारपेठ बंद ठेऊन प्रशासनाला पाचारण केले. संपुर्ण कोवाड ग्रामस्थ बाजारपेठेमध्ये जमले होते. चंदगडचे तहसिलदार विनोद रणावरे, भूमी अभिलेख अधिकारी अनिल जाधव, श्री. निलवे, सर्कल डी. व्ही. पाटील, तलाठी दिपक कांबळे, पोलिस अधिकारी यांनी ग्रामस्थांशी प्रत्यक्ष जाग्याव जाऊन सविस्तर चर्चा केली. चाळीस जणांच्या कमिटीशी चर्चा केल्यानंतर स्मशान भुमीच्या जागेची पाहणी केली. शेतकरी तुकाराम जाधव, प्रदिप जाधव, शिवाजी जाधव, रमेश जाधव यांच्याशी चर्चा करून सामंजस्याने स्मशानाची जागा निश्चित करुन हा प्रश्न चर्चेतून सामजष्यांने सोडविण्यात प्रशासनाला अखेर यश आले. 
कोवाड ग्रामस्थांना स्मशानभुमीच्या प्रश्नांबाबत मार्गदर्शन करताना तहसिलदार विनोद रणावरे व पदाधिकारी.
यामध्ये तहसिलदार विनोद रणावरे यांची भूमिका महत्वाची ठरली. चर्चेवेळी संपुर्ण ग्रामस्थ येत असल्याने या ग्रामस्थांना पोलिसानी जुन्या पूलाजवळच थांबण्याची विनंती केल्यानंतर ग्रामस्थ थांबले. चर्चेमध्ये सरपंच अनिता भोगण,  उपसरपंच विष्णू आढाव,  अशोक मनवाडकर,  रामा व्हन्याळकर, रामा वांद्रे, सुरेश वांद्रे, जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण, जोतिबा आढाव, रणजित भातकांडे, शंकर पाटील, आप्पा वांद्रे, तानाजी आढाव, वैजू भोगण,  एन. एम. पाटील यांच्यासह महिलांही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

No comments:

Post a Comment