चंदगड तालुक्यातील कोवाड परिसरात तासभर मुसळधार पाऊस - चंदगड लाईव्ह न्युज

22 June 2019

चंदगड तालुक्यातील कोवाड परिसरात तासभर मुसळधार पाऊस


कोवाड (ता. चंदगड) येथील बाजारपेठेत आज दुपारी तीनच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील कोवाड परिसरातील कर्यात भागात आज दुपारी सुमारे दिड तास मुसळधार पाऊस झाला. या परिसरात जून महिना सुरु झाल्यापासून हा पहिल्यादाच इतका मोठा पाऊस झाला. त्यामुळे येथील शेतकरी सुखावला आहे. आज सकाळपर्यंत झालेल्या चोवीस तासात 4.5 तर आतापर्यंत तालुक्यात सरासरी 130.83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
चंदगड तालुक्याचे पावसाच्या प्रमाणानुसार दोन भाग पडतात. तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी असते तर पश्चिम भागात पावसाचे प्रमाण पूर्व भागाच्या दुप्पट असते. मात्र आज पश्चिम भागात तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. मात्र पूर्व भागात पहिल्यांदाच सुमारे दिड तास मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच-पाणी झाले. या पावसामुळे कर्यात भागातील पेरणीच्या कामांना आता गती येणार आहे. हा पाऊस कोवाड, तेऊरवाडी, कागणी, होसुर, किणी, नागरदळे, कडलगे, ढोलगरवाडी, मांडेदुर्ग, कार्वे, सुंडी, करेकुंडी, महिपाळगड, शिनोळी, निट्टूर, घुल्लेवाडी, म्हाळेवाडी, शिवणगे, मलतवाडी, लकीकट्टे, माणगाव, तांबुळवाडी, डुक्करवाडी, हलकर्णी, दुंडगे, चिंचणे, कामेवाडी या परिसरात आज दुपारनंतर पाऊस झला. या पावसामुळे बळीराजा काहीसा सुखावला असला तरी बळीराजाला अजूनही मान्सुन पावसाची प्रतिक्षा आहे. आज सकाळपर्यंत चंदगड तालुक्यातील चंदगडमध्ये 7, नागनवाडी 13, कोवाड 2,  हेरे 5 तर माणगाव व तुर्केवाडी येथे काल दिवसभरात पाऊस पडला नाही. या पावसामुळे कर्यात भागातील शेतीच्या कामांना वेग येणार आहे.

No comments:

Post a Comment