|  | 
| मोरेवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामस्थ श्रमदानातून पाण्यासाठी तलावाची खुदाई करताना. | 
संजय पाटील, तेऊरवाडी
उंच डोंगर उतारावर वसलेल्या व कोरडवाहू असणाऱ्या मोरेवाडी (ता. चंदगड) येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी धडपडणाऱ्या ग्रामस्थांनी शेवटचा पर्याय म्हणून गावाशेजारी असणाऱ्या व कोरडा पडलेल्या जुन्या तलावाची श्रमदानाने खुदाई सुरु केली आहे.
अडकूरपासून जवळ बोंजूर्डी ग्रामपंचायतीशी संलग्नीत मोरेवाडी गाव आहे. नदिपासून दूर उंच डोंगरकपारीत हे गाव वसले आहे. यापूर्वी डोंगरात असणाऱ्या नैसर्गिक झऱ्यावर सायपन योजना राबवून गावची पाण्याची तहान भागवली जात होती. पण पावसाचे प्रमाण कमी झाल्याने हा झरा आटून ही योजना निकामी झाली. गावच्या वरील बाजूस छोटासा तलाव खोदला होता. पावसाळ्यामध्ये साठलेल्या पाण्याचा वापर जनावारांसाठी होत होता. पण शासनाने सहा लाख खर्चुन या तलावाची भिंत नुतू निकरन केली आणि तलावाचे पाणीच गायब झाले. सध्या याच तलावाच्या आतील गाळ श्रमदानाने मोरेवाडी ग्रामस्थ काढत आहेत. पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न खूपच गंभीर आहे. पाणीटंचाई लक्षात घेऊन शासनाने मल्लू गावडे यांचा खासगी मालकिचा बोअरवेल अधिग्रहन केला आहे. या बोअरवेलचे पाणी चार दिवसातून एकदा सोडले जाते. सद्या हाच ग्रामस्थांना आधार आहे. बोंजर्डी ग्रामपंचायतीची जलस्वराज्य पाणीयोजना घटप्रभा नदीवरून राबवली आहे. पण या योजनेचा खर्च परवडणारा नसल्याने मोरेवाडी ग्रामस्थानी या योजनेत भाग घेतला नव्हता. पुन्हा याच जॅकवेलपासून 17 लाख रूपये खर्च करून नविन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. पण या योजनेतही तांत्रिक व काही राजकिय अडचणी निर्माण झाल्याने ही योजनाही रखडली आहे. पाण्यासाठी कोणतेही राजकारण न आणता जर ग्रामस्थानी एकोपा ठेवून प्रयत्न केल्यास पाणीप्रश्न निकालात निघू शकतो. सध्या मात्र रोज मंगळवारी संपूर्ण गाव एकत्र येऊन तलाव खुदाई करण्यात येत आहे. यावेळी पो. पाटील मल्लू गावडे, उपसरपंच यशवंत घेवडे, अमृत पाटील, धोंडिबा पाटील, रामू घेवडे यांच्यासह महिला व युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
 

 
 
 
 
 
 
 
No comments:
Post a Comment