चंदगड / प्रतिनिधी
शहरासह परिसरात आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. त्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा जाणवत होता. गेले चार-पाच दिवस कधी ऊन तर कधी पाऊस असे चित्र तालुक्यात पहायला मिळत होते. मात्र आज सकाळपासून दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच असल्याने तापमानात घट झाली आहे. परिणामी बदलत्या वातावरणामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. आज सकाळी झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात सरासरी 7.66 तर आतापर्यंत 148.83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल दिवसभरात चंदगड सर्कलमध्ये 11, नागणवाडी 9, माणगाव 2, हेरे 24 मिलीमीटर तर कोवाड व तुर्केवाडी मंडलमध्ये पाऊस पडला नाही. तालुक्यात शेतकऱ्यांनी आज ना उद्या पाऊस लागेल या आशेवर पेरणी केली आहे. भाताचे तरवे उगवले असून त्याची जोमाने वाढ होण्यासाठी पावसाची गरज आहे. तालुक्याच्या वातावरणानुसार जून महिन्याच्या शेवटपर्यंत किमान एखादा तरी पूर येवून जातो हा इतिहास आहे. मात्र आता जून महिना संपत आला तरी मान्सुन पाऊस अद्यापही सुरु न झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. पावसाची वक्रदृष्टी अशीच राहील तर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना रोप लावण करण्यासाठी पाणी शोधावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment