कोवाड / प्रतिनिधी
नुकताच दहावी परिक्षेचा निकाल जाहीर झाला. या निमित्ताने चर्चा झाली ती मराठी विषयाच्या निकालाची. बऱ्याच वर्षांनी मराठी विषयाच्या निकालाने निचांक गाठला. त्यामुळे पाटणे फाटा येथे झालेल्या मराठी अध्यापक संघाच्या चिंतन शिबीरात मराठी विषयाच्या निकालाविषयी गंभीर चर्चा करण्यात आली. याबाबत जुलै महिन्यात कार्यशाळेचे नियोजन करण्याचे ठरले. अशी माहिती संघाचे कार्यवाह संजय साबळे यांनी दिली.
दहावी परिक्षेच्या निकालाच्या निमित्ताने एक गोष्ट पक्की झाली की स्वतःच्या मतानं या पिढीला चार ओळी लिहिता येत नसतील तर विचार करायची गरज आहे. विद्यार्थी, पालक यांना या निकालामूळे फार मोठा दणका दिला आहे. आकलन आणि स्वमत लिहिणे गरजेचे आहे. हे कुठल्या क्लासमध्ये जाऊन शिकता येणार नाही. या निकालामुळे पुन्हा एकदा अवांतर वाचनाचे महत्व अधोरेखित झाले आहे. मराठीच्या निकालाला पुन्हा सुगीचे दिवस यायचे असतील तर सर्व मराठी अध्यापक बांधवानी एकत्र येऊन यावर चिंतन करणे गरजेचे आहे. यावेळी मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष एम. एन. शिवणगेकर म्हणाले की, 'कृतिपत्रिकेला दोष देण्यात अर्थ नाही. स्पर्धा परिक्षांमध्ये लागणारी अचुकता, निर्णयक्षमता, उच्च आकलन क्षमता, तत्परता हे गुण विकसीत करायला नक्कीच मदत करणारी आहे. चिंतन शिबीराला एच.आर. पाऊसकर, बी.एम. पाटील, व्ही.एल. सुतार, एस.पी. पाटील, जी.आर. कांबळे, एम.एस. धुमाळे, पी. के. पाटील, सुरेश नाईक, आर. एन. पाटील, कमलेश कर्निक, एम. एच. कांबळे उपस्थित होते. आभार रवि पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment