शाहू पुरस्काराने कोवाडच्या वैभवात भर - चंदगड लाईव्ह न्युज

28 June 2019

शाहू पुरस्काराने कोवाडच्या वैभवात भर

जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण
अशोक पाटील : कोवाड प्रतिनिधी
सामाजिक विचारांची पक्की बैठक, अन्यायाविरोधात लढणा - यांना सक्रीय पाठींबा व गोरगरीबांसाठी मदतीचा हात देणाऱ्या आणि प्रश्नांची अभ्यासपूर्वक सोडवणूक करणारे माणगांव जिल्हा परिषद सदस्य कल्लापा भोगण यांना यंदाचा जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणारा ' राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार ' जाहीर झाला . पुरस्काराच्या रूपाने भोगण यांच्या प्रामाणिक कार्याचा सन्मान झाल्याची भावना चंदगड तालुक्यातून व्यक्त होत आहे . बुधवारी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी पुरस्काराची घोषणा केली . भोगण यांचे नाव पुरस्कारासाठी जाहिर झाल्याने त्यांच्या कार्यकत्यानी आनंदोत्सव साजरा केला . भोगण यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाच्या अडीच वर्षाच्या काळात मतदारसंघात ३५ कोटींचा विकास निधी आणला . अनेक शासकीय योजनांचा लाभार्थ्याना लाभ मिळवून देण्यात सहकार्य केले . रेंगाळलेल्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला . चंदगड भवन , कोवाड - होसूर व कोवाड - पाटणे फाटा रस्ता , माणगांव पुल तसेच कोवाड व राजगोळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न केले . तसेच प्राथमिक शाळांच्या इमारती , विद्यार्थी प्रवेश , जनावरांच्या आरोग्याच्या सोयी , ग्रामस्वच्छता व वृक्षारोपणसाठी जागर केला . विद्यार्थी दशेपासून भोगण यांचा राजकीय व सामाजीक क्षेत्रात सहभाग आहे. सन २००५साली कोवाड गावचे सरपंचपद त्यानी भूषविले . सरपंचपदाच्या काळात कोवाड गावच्या विकासाला गती दिल्याने गावाला  यशवंत ग्राम पुरस्कार मिळविला . कोवाडला विकासाचा चेहरा दिला. स्वर्गिय आमदार नरसिंगराव पाटील , गोपाळराव पाटील , बाबा कुपेकर , आमदार संध्यादेवी कुपेकर व अशोकराव देसाई या दिग्ज नेत्यांचे त्याना मार्गदर्शन लाभले.  राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना गटा - तटाच्या भिंती बाजूला करून त्यांनी केवळ गावच्या विकासासाठी अनेकांचे सहकार्य मिळविले आहे . सन २०१७ साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले . जिल्हा परिषदेत सत्तेची रस्सीखेच सुरू असताना प्रत्येक सदस्याला सोनेरी किनार लाभली होती. पण अशा परिस्थितीत पदाला किंमत न देता कल्लापा भोगण यांनी तालुक्याच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला . त्यामुळे अडीच वर्षात ३५ कोटींचा विकास आराखडा तयार करुन त्याचा पाठपुरावा सुरू केला . यामध्ये अनेक कामे मार्गी लागली आहेत . त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानीत केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अशोक पाटील, कोवाड
 

No comments:

Post a Comment