![]() |
मुसळधार पावसामुळे रोपलावणीची धांदल सद्या शिवारात सुरु आहे. |
शहरासह परिसरात आज दिवसभर मुसळधार पाऊस सुरु आहे. संततधार सुरु असलेल्या पावसामुळे ताम्रपर्णी व घटप्रभा या तालुक्यातील दोन नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. पावसाचा जोर असाच राहिल्यास येत्या दोन दिवसात पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे मौजे करंजगाव येथील गौराप्पा लक्ष्मण दळवी यांच्या घराची भिंत कोसळून दह हजारांचे तर मौजे तुर्केवाडी येथील आदम महंमद शेख यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. शिवारात सद्या रोपलावणीची धांदल सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. त्यामुळे संततधार सुरु असलेला हा पाऊस रोपलावणीसाठी उपयुक्त ठरला आहे. शेतात रोपलावणीची धांदल सुरु झाल्याने मंजुरांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र हंगाम असल्यामुळे मजुरांचा भावही कमालीचा वधारला आहे. रोपलावणीसाठी चिखल करण्यासाठी पारंपारिक बैलजोडीसह आधुनिक पध्दतीने रोटावेटरचाही उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने कमी वेळेत अधिक काम होत आहे. त्यामुळे बैलजोडी नसलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. रोटवेटरच्या दराबाबत मात्र मालकागणित भिन्नता पहायला मिळत आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात सरासरी 63.83 तर आजअखेर 674 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
No comments:
Post a Comment