![]() |
चंदगड-हेरे मार्गावरील ताम्रपर्णी नदीवरील चंदगड पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक दुपारी तीन वाजल्यापासून बंद झाली. तरीही वाहनधारक जीव धोक्यात घालून वाहतुक करताना.
|
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात गेल्या आठवडाभरापासुन पावसाची संततधार सुरुच आहे. कधी मुसळधार तर कधी उघडीप असे चित्र गेले आठवडाभर होते. आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कालपर्यंत सलग तिसऱ्या दिवशी कोनेवाडी, हल्लारवाडी व करंजगाव हे तीन बंधारे पाणीखालीच आहेत. त्यात आज दिवसभरात भर पडून गवसे, कानडी, माणगाव, भोगोली, पिळणी हे बंधारे तर चंदगड-हेरे मार्गावरील पुल व हिंडगाव इब्राहिमपूर मार्गावरील मांगलेवाडी जवळील पुल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक अन्यत्र वळविण्यात आली आहे. सतत धो-धो पडणाऱ्या पावसामुळे जवजीवन विस्कळीत झाले आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात तालुक्यात सरासरी 69.5 तर आतापर्यंत 937.66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील मंडलनिहाय पाऊस चंदगड -87 मिमी (1064), नागणवाडी -73मिमी ( 846), माणगाव -31मिमी (309), कोवाड -29मिमी (323), तुर्केवाडी -85मिमी (1032), हेरे -112मिमी (1619). तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चंदगड तालुक्यातील मौजे गौळवाडी येथील गुंडू विठोबा ओऊळकर व शिवाजी गुंडू ओऊळकर यांच्या घराची भिंत पडून 100000 रुपयांचे नुकसान झाले असून या घराच्या बाकीच्या भिंतींना तडे गेल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कुटुंब शेजारी स्थलांतर केले आहे. मौजे जंगमहट्टी येथील रामचंद्र जोतिबा मोरे यांच्या घराची भिंत कोसळून 50000 नुकसान झाले आहे.
चंदगड-हेरे मार्गावरील ताम्रपर्णी नदीवरील चंदगड पुलावर पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक पाटणे फाटा-मोटणवाडी मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना 25 किलोमीटरचा अतिरिक्त भुर्दंड व वेळेचाही अपव्यय होत आहे. चंदगड-हेरे मार्गावरील ताम्रपर्णी नदीवरील चंदगड पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक दुपारी तीन वाजल्यापासून बंद झाली. तरीही खासगी वाहनधारक जीव धोक्यात घालून वाहतुक करत आहेत. एखादी दुर्घटना घडण्याअगोदर या ठिकाणी पोलिसांच्याकडून पाण्यातून वाहतुक करणाऱ्यांना रोखण्याची गरज आहे. प्रवाशांना धोक्याचा इशारा सांगणारा फलकही संबंधित खात्याकडून लावण्यात आला आहे, तरीही लोक याकडे दुर्लक्ष करत जीव धोक्यात घालून पाण्यातून वाहतुक करत आहेत. गवसे बंधाऱ्यावर पाणी आल्याने गवसे ग्रामस्थांना चंदगड अडकूरमार्गे गवसेला जावे लागत आहे. कानडी बंधाऱ्यामुळेही बिकट अवस्था झाली आहे. माणगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने माणगावची वाहतुक तांबुळवाडीमार्गे वळविण्यात आली आहे. कोनेवाडी, हल्लारवाडी व करंजगाव बंधाऱ्यावर सलग तिसऱ्या दिवशीही पुरपरिस्थिती असल्याने हि वाहतुकही पाटणे फाटा मार्गे वळविण्यात आली आहे. चंदगड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
No comments:
Post a Comment