कर्मचाऱ्यांच्या साहसाचे परिसरातून कौतुक
संजय पाटील, कोवाड
संजय पाटील, कोवाड
नोकरी मिळाल्यानंतर नोकरी तर सगळेच करतात, मात्र जीवावर उदार होवून नोकरी करणे म्हणजे हे काय हे आज पहायला मिळाले. सात गावांचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांनी लोकांच्या घरांना प्रकाश देण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला. आज कोवाड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या येथील कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन धो-धो पडणाऱ्या पावसाची तमा न बाळगता पुराच्या पाण्यातून पोहत जावून अर्ध्या पाण्यात असलेल्या विद्युत डीपीवर चढून नादुरुस्त डीपी दुरुस्त केली. त्यामुळे गेले तीन दिवस अंधारात असलेल्या कागणी, कौलगे, कल्याणपूर, होसुर, बुक्कीहाळ खुर्द, बुक्कीहाळ बुदुक व किटवाड या गावातील लोकांच्या घरात तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर प्रकाश पोहोचला.
गेले तीन दिवस बंद व विस्कळित झालेला वीज पुरवठा सुरळीत केला. कोवाड व परिसरात गेले आठ दिवस अखंड पाऊस सुरू असून महावितरणच्या बऱ्याचशा लाईनचा पुरवठा वारंवार खंडीत होत होता. त्यातच कागणी गावठाण फीडरचा कोवाड हद्दीतील मेन लाईनचा पोल पडला. पर्यायी पुरवठा म्हणून एका दुसऱ्या लाईन वरून मोठया जिकिरीन हा पुरवठा चालू होता. पण ते सोईचे नसल्यामुळे आज स्टाफ मधील कर्मचारी सुनिल कदम, मनोज सोनोने, युवराज कोकितकर, राम शिराढोणे, लाईनमन सतिश पळसे, अजित परीट, आकाश जाधव यांनी नदीचे पात्र जरी ओसंडून वाहत असले तरी भर पुराच्या पाण्यात प्रवेश करून अविस्कळित झालेला कागणी गावठाण फीडरचा विद्युत पुरवठा सुरळीत केला. सदर फिडर वरील पुढील 7 ते 8 गावचा विज पुरवठा या कामामुळे सुरळित झाला. नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे थोडासा देखील हलगर्जीपणा जीवावर बेतला असता. पण या कर्मचाऱ्यांनी कामाला प्रथम प्राधान्य दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याकामी कोवाड सेक्शन ऑफिस दोनच्या शाखा अभियंता वर्षा पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
2 comments:
Grand salute.....real hero
Good job brothers
Post a Comment